

पोखरापूर: जेवण करत नाही आणि शाळेत जात नाही, अशा क्षुल्लक कारणांवरून सुरू असलेल्या छळाची परिणती एका तीन वर्षीय चिमुकलीच्या हत्येत झाली. सावत्र आईनेच पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करण्याऐवजी तिचा गळा दाबून खून केल्याची मन हेलावून टाकणारी घटना मोहोळ तालुक्यातील वडवळ स्टॉप येथे शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी सावत्र आईला अटक केली आहे.
कीर्ती नागेश कोकणे (वय ३) असे हत्या झालेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिची सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे (वय ३३) हिला अटक केली आहे.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश कोकणे हे आपली दुसरी पत्नी तेजस्विनी आणि पहिल्या पत्नीच्या दोन मुली, कीर्ती (वय ३) व आकृती, यांच्यासोबत वडवळ स्टॉप येथील विष्णू नरुटे यांच्या घरात भाड्याने राहत होते. गेल्या काही काळापासून तेजस्विनी या दोन्ही सावत्र मुलींचा सतत छळ करत होती. जेवण न करणे किंवा शाळेत जाण्यास नकार देणे यांसारख्या सामान्य कारणांवरून ती मुलींना अमानुष मारहाण करत होती. मारहाणीसोबतच ती दोन्ही चिमुकल्यांना चटके देऊन शारीरिक इजा पोहोचवत होती. शुक्रवारी (दि.१) सकाळी साडेदहाच्या सुमारास हाच राग अनावर झाल्याने तेजस्विनीने तीन वर्षीय कीर्तीचा गळा दाबून तिची हत्या केली. याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात तेजस्विनी कोकणे हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कर्णेवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
"घटनेचे गांभीर्य ओळखून आम्ही तातडीने कारवाई केली आहे. आरोपी सावत्र आईला अटक करण्यात आली असून, मृत मुलीचे शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून, आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत." - हेमंत शेडगे, पोलीस निरीक्षक, मोहोळ या अमानवी घटनेमुळे वडवळ आणि पोखरापूर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. आईच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.