

मोहोळ शहर : मोहोळ शहरात नवीन पोलिस अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारून काही दिवस उलटले असतानाही शहरातील बेकायदेशीर धंद्यांना आळा बसलेला दिसत नाही. उलट हातभट्टी दारू, जुगार आणि मटका व्यवसाय पूर्वीप्रमाणेच जोरात सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी हे सर्व प्रकार पोलिसांच्या आशीर्वादामुळेच सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
शहरातील मेनरोडवर अवैध व्यसाय खुलेआम सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत जुगाराच्या बैठका रंगत असल्याचेही सांगितले जात आहे. यासोबतच मटका व्यवसायही काही ठिकाणी बिनधास्तपणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. नवीन पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर शहरात कायदा-सुव्यवस्था कडक होईल, बेकायदेशीर धंद्यांवर लगाम बसेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल दिसत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
दरम्यान, हे सर्व प्रकार नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. संबंधित ठिकाणी तातडीने कारवाई करून हातभट्टी दारू, जुगार आणि मटका अड्डे बंद करावेत, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहे. मोहोळ शहरातील या बेकायदेशीर धंद्यांवर पोलिस प्रशासन कधी आणि कशी कारवाई करणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.