Mohol Solapur Highway Accident | मोहोळ-सोलापूर महामार्गावर दोन एसटी बसचे वेगवेगळे अपघात; दोघांचा मृत्यू

वडवळच्या हद्दीत अवघ्या तासाभरात दोन अपघात; ७९ वर्षीय वृद्धासह दुचाकीस्वाराचा मृत्यू, महिला गंभीर जखमी
 Accident  News
Accident Newsfile photo
Published on: 
Updated on: 

मोहोळ : मोहोळ-सोलापूर महामार्गावर वडवळ गावच्या हद्दीत सोमवारी (दि. २३) अवघ्या तासाभराच्या अंतराने दोन एसटी बसचे अपघात झाले. सोलापूरकडे जाणाऱ्या एसटी बसने रस्ता ओलांडणाऱ्या ७९ वर्षीय वृद्धाला धडक दिली, तर सोलापूरकडून मोहोळकडे येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. या दोन्ही अपघातांत चंद्रकांत कृष्णा बरडे (वय ७९, रा. मानेगाव, ता. माढा) आणि शिवाजी आप्पा महापुरे (वय ५२, रा. मार्डी ता. उत्तर सोलापूर) यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली आहे.

चंद्रकांत कृष्णा बरडे
चंद्रकांत कृष्णा बरडे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिला अपघात सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वडवळ गावच्या हद्दीत घडला. फलटण-पंढरपूर-मोहोळ मार्गे तुळजापूरकडे जाणारी एम .एच. २० जी. सी. ३०४१ क्रमांकाची एसटी बस सोलापूरच्या दिशेने जात असताना चंद्रकांत बरडे यांना बसने जोराची धडक दिली.

या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. दुसरा अपघात सोमवारीच दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वडवळ गावच्या हद्दीतच घडला. एमएच १४ बी.टी . ४८४१ क्रमांकाच्या तुळजापूर-मेढा एसटी बसने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या पती-पत्नीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील शिवाजी आप्पा महापुरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या.

शिवाजी महापुरे यांना उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शिवाजी महापुरे यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी महिलेला पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे.

या दोन्ही अपघातांप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पुढील तपास अपघात विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल क्षीरसागर करीत आहे.

एकाच महामार्गावर एसटी बसचे दोन अपघात; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

वडवळ गावच्या हद्दीत अवघ्या तासाभराच्या अंतराने दोन एसटी बसचे अपघात होऊन दोघांना जीव गमवावा लागला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. सोलापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्यावर घडलेल्या या दोन घटनांमुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. वाहनांचा वेग, चालकांचे वाहनावरील नियंत्रण आणि रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.