

पोखरापूर : मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसुली किंवा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. आबासाहेब काशीद, आकाश श्रीकांत बाबर, धनराज अविनाश भोसले (रा. पोखरापूर, ता. मोहोळ) अशी त्यांची नावे असून पोलिसांनी त्यातील दोघांना अटक केली आहे.
याबाबतची फिर्याद रमेश कदम यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वा. च्या दरम्यान रमेश कदम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोहोळ येथील कार्यालयातून उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावाकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. त्या व्यक्तीने कार्यकर्ता असल्याचे सांगत काही लोकांकडून तुमच्या जीवाला धोका आहे, शिवाय त्यासंदर्भात माझ्याकडे काही रेकॉर्डिंग असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने त्याच्याकडे असलेले व्हिडिओ व ऑडिओ रेकॉर्डिंग रमेश कदम यांना पाठवले. सदरच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये रमेश कदम यांना उचलून अपहरण करून पुणे येथे नेण्याबाबत व त्या मोबदल्यात पैसे देण्याबाबत संभाषण असल्याचे दिसून आले. तर ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती त्याची गँग असल्याचे सांगत आहे. तो गँगचे पैसे मागत असून समोरचा व्यक्ती रिवॉल्वर, गाडी व पैसे हे कामासाठी देण्याबाबत व काम झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून पैसे देण्याबाबतचे संभाषण आहे. त्यानंतर या संदर्भात रमेश कदम यांनी मोहोळ पोलिसांना तात्काळ माहिती दिली.
पोलिसांनी आकाश बाबर याच्याकडे चौकशी करून त्याचा साथीदार धनराज भोसले याच्याकडे चौकशी केली. दरम्यान, कदम यांनी आबासाहेब काशीद, आकाश बाबर व धनराज भोसले अशा तिघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आकाश बाबर आणि धनराज भोसले या दोघांना अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील करत आहेत.
माझ्या जीविताला धोका असल्याबाबत मी यापूर्वीही पोलीस अधीक्षकांना पत्र दिले असून आता त्यानंतर तिघांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे. कोणी सुपारी दिली, याचा तपास गृह खात्याने करून कारवाई करावी. तसेच तात्काळ मला पोलिस संरक्षण मिळावे.
- रमेश कदम, माजी आमदार, मोहोळ