

मोहोळ : मोहोळ येथील पुणे-सोलापूर व सोलापूर-पंढरपूर पालखी मार्ग या दोन्ही ठिकाणच्या दोन्ही सेवा रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावणे आवश्यक असून महामार्गाच्या दोन्ही ठिकाणच्या सेवा रस्यावरून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या गाड्या थेट सोलापूरला किंवा विजयपूर रस्त्याने कुरूलकडे जात आहेत. दिशादर्शक फलक नसल्याने येथे नेहमीच अपघात होत असल्याने सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आणि सोलापूर-पंढरपूर पालखी मार्गाच्या जोडरस्त्यांवर पुरेसे व स्पष्ट दिशादर्शक फलक नसल्याने पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या अनेक भाविकांच्या गाड्या थेट सोलापूरकडे निघून जातात, तर काही वाहने विजयपूर रस्त्याने कुरूलच्या दिशेने वळतात. चुकीच्या मार्गावर गेल्यानंतर वाहनचालक घाईघाईने वाहन वळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याबरोबरच गंभीर अपघातांची शक्यता वाढते.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महामार्गावरील मुख्य चौक, उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांवर स्पष्ट, मोठे व रात्रीही सहज दिसतील असे दिशादर्शक फलक बसविण्याची आवश्यकता आहे. विशेषतः पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर आणि विजयपूरकडे जाणाऱ्या मार्गांची स्पष्ट माहिती देणारे फलक लावल्यास वाहनचालकांचा गोंधळ कमी होऊ शकतो.
दरवर्षी आषाढी वारी, कार्तिकी वारी तसेच इतर धार्मिक उत्सवांच्या काळात लाखो भाविक या मार्गाचा वापर करतात. अशावेळी योग्य दिशादर्शन नसल्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त प्रवास करावा लागतो, वेळ व इंधनाचा अपव्यय होतो आणि अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोन्ही सेवा रस्त्यांवर आणि महत्त्वाच्या वळणांवर दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी केली आहे. योग्य दिशादर्शकाची व्यवस्था केल्यास भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुखकर होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
केवळ फक्त पंढरपूरचा दिशादर्शक बोर्ड लावून चालणार नाही तर सोलापूर ते पुणे व पंढरपूर ते मोहोळ हे दोन्ही नॅशनल हायवेज असून त्यावर तीर्थक्षेत्राला येणाऱ्या भाविकांची तसेच अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणावर आहे. या दोन्ही महामार्गावरची वाहतूक शहरातील सर्व्सिस रोड वरून घेणे हा शुद्ध निष्काळजीपणा असून याला फ्लाय ओव्हर ब्रिज वरून इंटर सेक्शन सर्कल निर्माण करून पंढरपूरकडे जाणारा येणारा वेगळा रस्ता द्यावा लागेल किंवा मोहोळ शहराच्या बाहेरून संपूर्ण पंढरपूर बायपास द्यावा लागेल तरच मोहोळ शहरांमधील गंभीर अपघातांचे प्रमाण कमी होईल. यासाठी सर्वजण सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा करणे गरजचे आहे.