
सोलापूर : विमानतळ , वेअर हाऊस आदी मोठे प्रकल्प अदानी यांच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू आहे. महाराष्ट्राचे अदानीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. सर्व उद्योग गुजरातला जात आहेत. महाराष्ट्राला विकू पाहणाऱ्या भाजपला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. महाराष्ट्राचे गद्दारी करणे हे माझ्या रक्तात नाही. मी लढतोय, मंजूर असेल तर सोबत या ? नाहीतर मी एकटा आहेच. मोदी आणि शहा यांनी शिवसेनेचा घात केला आणि चोर कंपनी घेऊन माझ्यावरच वार करायला येत आहात. हे कदापि शक्य होणार नाही. वार करायला येणार असाल तर माझा शिवसैनिकच तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी सोलापुरातील जाहीर सभेत दिला.
ठाकरे म्हणाले,काश्मीर मधील ३७० कलम काढताना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आणि हे कलम काढल्यानंतर अदानी वगळता कोणीही त्या ठिकाणी जागा विकत घेतलेली नाही. हिंदू पंडितांची काश्मिरात हत्या होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा कोठे होते, असा सवालही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. काश्मीरमधील निर्वासित हिंदू पंडितांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आसरा दिल्याचा दाखलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला.(Maharashtra assembly poll)
महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना १५०० नव्हे तर ३ हजार रुपये देणार असल्याचेही ते म्हणाले. गद्दारांना ५० कोटी आणि बहिणींना मात्र १५०० रुपये हा कोणता न्याय ? अशा शब्दात ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवली.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सांगोला विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारात रविवारी उद्धव ठाकरे यांनी सांगोला आणि सोलापुरात दोन जाहीर सभा घेतल्या. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी महायुती सरकारचा समाचार घेतला.(Maharashtra assembly poll)
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने जीवाचे रान केल्यामुळे दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आल्याची आठवण करून देतानाच खासदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या सोलापुरातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी बाहेर पडावे असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला.