

करमाळा : पतीच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने पत्नीने स्वतःची किडनी देवून पतीला यमराजाच्या दारातून पुन्हा जीवदान मिळविले असल्याची घटना पोंधवडी येथे घडली. आज ते साळवे दांपत्य सुखरूप पुन्हा आपले जीवन जगत आहेत.
पोंधवडी येथील संजय साळवे हे स्वतःचा टेम्पो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. ते आजारी पडल्यानंतर त्यांची किडनी खराब झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार करमाळा येथे मोफत डायलिसिस सेंटर सुरू केले असून तिथे साळवे डायलिसिस करिता येत असताना त्यांची संपूर्ण अडचण त्यांनी महेश चिवटे यांना सांगितली. तातडीने महेश चिवटे यांनी आरोग्यदुत मंगेश चिवटे यांना विषयाचे गांभीर्य सांगुन उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे मदतीने संपूर्ण आरोग्य सुविधा पुरविली.
दरम्यानच्या काळात संजय साळवे यांची पत्नी रूपाली साळवे यांनी आपली चार लहान मुले दिराच्या घरी वर्षभर ठेवून अखेर पर्यंत प्रयत्न करून माझ्या पतीला जिवनदान मिळवायचा निश्चय केला होता. डॉकटरांनी संजय साळवे यांना जगण्याची आशा तुम्ही सोडा, असे सांगितल्याचे साळवे यांनी सांगितले. यावेळेस आधुनिक सावित्री ठरलेली त्यांची पत्नी रूपाली साळवे हिने स्वतःची किडनी पतीला देण्याचा निश्चय केला. सर्वांच्या विरोधाला डावलून पतीला किडनी देण्याचा निर्णय तिने घेतला आणि साळवे दांपत्य सुखरूप पुन्हा आपले जीवन जगत आहेत