

सांगोला : सोलापूर येथील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये शिवसेनेच्या जिल्ह्यातील नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
शहाजी बापू पाटील म्हणाले की, राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच्या दिवशीच विजय निश्चित झाला असून आता केवळ औपचारिकता बाकी आहे. सांगोला तालुक्यातील सर्व ३४ मते राजेंद्र राऊत यांनाच मिळतील. शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे यांचा शब्द अंतिम असून एका मताचाही फरक पडणार नाही.
उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, शिवसेना पूर्ण ताकदीने महायुतीसोबत उभी राहील. राजेंद्र राऊत यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी शिवसैनिक प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. उमेदवार राजेंद्र राऊत म्हणाले की, जिल्ह्यामध्ये महायुती माझ्या पाठीमागे असून मा. आ. शहाजी बापू पाटील व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासारखी मातब्बर मंडळी सोबत असल्यामुळे सर्वांचा आशीर्वाद मिळेल, हीच अपेक्षा आहे.
बैठकीस खासदार धैर्यशील माने, माढा लोकसभा संपर्कप्रमुख पैलवान चंद्रहार पाटील, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.