

पोखरापूर : गेल्या अनेक वर्षांमध्ये कधीही मोहोळ तालुक्याने एवढी भयानक पूर परिस्थिती पाहिली नाही ती चालू वर्षी पाहिली. यामध्ये अनेक गावे पाण्याखाली होती. हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शासनाने नुकसान भरपाई देऊन मदतीचा हात दिला परंतु शासनाच्या चांगल्या हेतूचे तीन तेरा करण्याचे पाप मोहोळ तालुक्यातील 10 ते 12 गावातील तलाठी व ग्रामसेवक यांनी केले आहे. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करत निलंबित करावे व त्या 12 गावांचे फेर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी हिवाळी अधिवेशनात आमदार राजू खरे यांनी केली.
हिवाळी अधिवेशनामध्ये विविध मागण्या करताना मोहोळच्या आमदार राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यातील पूर परिस्थितीबाबत माहिती दिली. ते यावेळी म्हणाले, तालुक्यातील सिना नदीकाठच्या 10 ते 12 गावातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे, घरांचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला खरा परंतु त्या गावातील तलाठी व ग्रामसेवकांनी ज्याच्या घराला पाणी लागले नाही, ज्याच्या शेतात पाणी गेले नाही अशा लोकांना नुकसान भरपाई दिली.
जो शेतकरी खरोखरच पुरात अडकला, ज्याचे नुकसान झाले, त्याला मात्र नुकसान भरपाई पासून वंचित ठेवले. अशा तलाठी व ग्रामसेवकांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे. पूर परिस्थितीमुळे नदीकडच्या गावात आणखी काही भागात विद्युत पुरवठा चालू नाही. शेतकऱ्यांची जनावरे, पिके पाण्यावाचून होरपळत आहेत. परंतु लांबोटी येथील महावितरण चे शाखा अभियंता ओंकार साठे यांनी जो कोणी त्यांना 25 ते 30 हजार रुपये देईल, त्यांचा डीपी अगोदर लावण्याचे काम सुरू केले आहे. पूरपरिस्थितीमुळे मोहोळ तालुक्यातील शेतकरी मेला असताना महावितरण चे अधिकारी त्रास देण्याची भूमिका घेत आहेत.
पैसे दिले की मोठ्या बागायतदारांचा डीपी लागतो, याची चौकशी करून साठे यांना ताबडतोब निलंबित करावे अशी मागणी ही आमदार खरे यांनी यावेळी केली. तसेच पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरही आ. खरे यांनी आवाज उठवला. शेतकऱ्यांना नुकसानी पासून दिलासा मिळावा यासाठी आर्थिक सहाय्याची गरज अधोरेखित करत सरकारचे लक्ष वेधले. आमदार खरे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचे महत्त्वाचे विषय सभागृहात मांडल्याने मतदारसंघातून समाधान व्यक्त केले जात आहे.