

सोलापूर : साम, दाम आणि दंड वापरुन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिकेची निवडणूक लढविली. भाजपाची सत्ता आल्यानंतर विजयाचा जल्लोष करताना जो इशारा केला तो शहराच्या संस्कृतीशी नाही. सत्ता त्यांच्या डोक्यात गेल्यामुळे ते असंस्कृत वागत असल्याची टीका खा. प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांवर केली आहे.
खा. शिंदे म्हणाल्या, पालकमंत्री गोरे हे पहिले काँग्रेस पक्षात होते. त्यांना आमिष दाखविल्याने ते भाजपात गेले. तिकडे गेल्यानंतर त्यांच्या संस्कृतीमध्ये बदल झाला असून, ते सत्तेसाठी बळाचा वापर करत आहेत. मी काँग्रेस कार्यकर्त्यांना पत्र लिहिले होत, जयकुमार गोरे स्वतः काँग्रेसचे होते. त्यामुळे कदाचित त्यांनी ते पत्र वाचलं असेल. त्यांची संस्कृती काय आहे, त्यांनी कुठल्या पद्धतीने महापालिकेची निवडणूक लढवली आहे, याचा विचार एकदा त्यांनी करावे, असा सल्ला खा. शिंदे यांनी दिला आहे.
जिथे शक्य ते आघाडी करुन लढू
जिल्हा परिषद निवडणुकीत जिथे आघाडी होऊ शकते तिथे आघाडी करणार आहे. भाजपने कितीही साम, दाम, वापरले तरी काँग्रेस जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढणार आहे. ही तत्वाची लढाई असून ती लढणार आहे. ग्रामीण भाग आणि शहरी भागाचा व्होटिंग पॅटर्न वेगळा असून, ग्रामीण भागात भाजपाच्या विरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यासाठी निवडणूक लढणार असल्याचे खा. शिंदे यांनी सांगितले.