

सोलापूर : ऐतिहासिक स्थळे लहान झाली म्हणून ती पाडायची का? मग तर देशातील व्हॅटिकन चर्च, तिरुपती आणि पंढरपूरची मंदिरेही पाडून टाका म्हणाल, असा संतप्त सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मंदिराचा गाभारा पाडण्याच्या हालचालींवरून सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा साक्षीदार असलेला हा हजारो वर्षांचा वारसा नष्ट करण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी बुधवारी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
आमदार आव्हाड यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडताना तुळजाभवानी मंदिराच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला. मी येथे राजकारण करायला नाही, तर एक भक्त म्हणून आलो आहे. या मंदिरातून मला ऊर्जा मिळते. पण आज जे घडतंय ते अत्यंत वेदनादायी आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुरातत्त्व विभागाचा अहवाल मंदिराचे नूतनीकरण करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट सांगत असतानाही, सरकार हा अट्टाहास का करत आहे, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, केवळ गाभारा छोटा आहे या सबबीखाली मंदिरातील हजारो वर्षे जुनी शिल्पे छन्नी-हातोड्याने तोडली जात आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज ज्या मंदिरात दर्शनाला गेले, त्या मंदिराच्या भिंती आणि शिल्पे या घटनेच्या साक्षीदार आहेत. हा ऐतिहासिक संदर्भ पुसण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मंदिराचा गाभारा पाडण्याची किंवा नूतनीकरणाची गरज नाही, असा स्पष्ट अहवाल पुरातत्त्व विभागाने दिला आहे. या पवित्र स्थळांचे ऐतिहासिक महत्त्व नष्ट करण्यामागे सरकारचा नेमका हेतू काय आहे, हे कळायला मार्ग नाही. मी दोनशेपेक्षा जास्त वेळा मंदिरात आलो आहे. माझा या निर्णयाला राजकीय नव्हे, तर एक भक्त म्हणून तीव्र विरोध आहे.
निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप
याच पत्रकार परिषदेत बोलताना आव्हाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ’मत चोरी’च्या आरोपांना पाठिंबा दिला. ते म्हणाले, सरकारने संविधानातील कायदे पायदळी तुडवले आहेत. निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीचे नियम बदलून लोकशाही खड्ड्यात घालण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रातील पक्षांतर आणि त्याला मिळालेली मान्यता हे सर्व निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानेच झाले आहे, असा घणाघात त्यांनी केला.
विविध विषयांवर भाष्य...
याशिवाय, कल्याण-डोंबिवलीतील मांस-मटण दुकाने स्वातंत्र्यदिनी बंद ठेवण्याचा आदेश, बीडीडी चाळीच्या प्रकल्पाचे श्रेय, दादरच्या कबुतरखान्याचा वाद आणि अमेरिकेने लादलेल्या टॅरिफवर मोदी सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी सविस्तर भाष्य करत सरकारला धारेवर धरले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.