

माढा : माढा तालुक्यात जे काही चांगल काम झाल आहे, ते अणखीन चांगल करण्यासाठी मला जनतेने निवडून दिले आहे. संविधानाने मला जे अधिकार दिले आहेत त्याच्या जोरावरच मी विकासकामांचे उद्घाटन करत आहे. यात श्रेयवादाचा प्रश्नच येत नाही. जे आहे त्यापेक्षा चांगल करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे, असे प्रतिपादन माढ्याचे आ अभिजीत पाटील यांनी केले.
ते बार्शी उपसा सिंचन योजनेतून अंजनगाव उ येथील तळ्यात आलेल्या पाण्याच्या जलपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी आ पाटील म्हणाले की तालुक्यातील सीना माढा उपसा जलसिंचन योजनेची तृतीय सुप्रमा आता मंजूर झाली आहे. त्यातून भूसंपादनासाठी वीस कोटी रक्कम मंजूर झाल्याने त्याचे उर्वरित काम मार्गी लागेल. गेल्या तीस वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली, माढा तालुक्याच्या पूर्व भागाच्या जिव्हाळ्याची बार्शी उपसा सिंचन योजना आज खर्या अर्थाने कार्यान्वित झाली आहे. अंजनगाव उमाटे येथील पाझर तलावात योजनेचे पाणी दाखल झाले.हा पाणी पूजनाचा भावनिक क्षण अनुभवता आला.
ही योजना माढा तालुक्यातील सात गावांसाठी वरदान ठरणार आहे. या योजनेसाठी वेळोवेळी अधिकार्यांशी चर्चा, पत्रव्यवहार, आणि बैठका लावून हे पाणी तालुक्यात आणण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहिलो आणि अखेर या प्रयत्नांना यश आले. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारकडे विकास कामांसाठी निधी उपलब्ध नाही. त्यात आपण विरोधी पक्षाचा आमदार यामुळे निधी उपलब्ध होण्यास अडचण येत आहे. यावेळी विलास देशमुख, नितीन कापसे, रामकाका मस्के, ज्योतीताई कुलकर्णी, आनंद कानडे, दिनेश जगदाळे, विनंती कुलकर्णी, वाय. जी. भोसले, सोमासे सर, शंभूराजे साठे, आबासाहेब साठे, भैय्या खरात, राहुल जाधव, सरपंच रामहारी आदलिंगे, पप्पु मुळे, संदीप उमाटे, सिराज शेख, मोहन सुतार, नितीन थोरे आदी उपस्थित होते.
यावेळी नितीन कापसे यांनी माजी आ बबनदादा शिंदे यांच्याआधी माजी आ विनायकराव पाटील हे आमदार होते. विनायकराव पाटील यांच्या कार्यकाळात मंजूर असलेल्या अनेक विकासकामांचे बबनदादांनी उद्घाटने केली असे सांगून तुमचा पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण करण्याबरोबरच शेतकर्यांचे खराब झालेले सिबील दुरुस्त करून द्या. झालेला पराभव स्वीकारा. संविधानाने दिलेल्या अधिकाराने आ अभिजीत पाटील हे विकासकामांची उद्घाटने करीत आहेत तो त्यांचा अधिकार आहे असे सांगत श्रेयवादावरुन चाललेली ओरड थांबविण्याचा सल्ला विरोधकांना दिला.