

माढा : माढा तालुक्यात वास्तव्यास असणारा बिबट्या तातडीने जेरबंद करा. त्यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टळेल, अशी मागणी माढा मतदारसंघाचे आ. अभिजित पाटील यांनी विधानसभेत केली. माढा तालुक्यातील भेंड, पालवण, वरवडे, अकुंभे, व्होळे या ठिकाणी 16 जूनपासून बिबट्या वास्तव्यास असल्याचे अनेकांनी सांगितल्यावर या ठिकाणची ड्रोनव्दारे पाहणी करण्यात आली. त्या पाहणीत पालवण या ठिकाणी हा बिबट्या आढळून आला आहे. दहा ते बारा लहान प्राण्यांची बिबट्याने शिकार केली आहे.
या भागात प्रशासनाकडून पिंजरे लावण्यात आले आहेत, गस्तदेखील चालू आहे. मात्र अद्याप बिबट्या सापडला नाही.बिबट्याच्या वास्तव्यामुळे या भागातील शेतकरी, कामगार, शेतमजूर, शालेय विद्यार्थी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तातडीने रेस्क्यू करून या बिबट्यास जेरबंद करणे गरजेचे आहे. दक्षिण भारतातून बिबट्याची तस्करी केली जाते. टेंभूर्णी या ठिकाणी नाकाबंदीत तपासणी केल्यानंतर बिबटे आढळून आले तर ते सोडून दिले जातात. ते बिबटे माढा भागात येतात. यामुळे जीवितहानी व मनुष्यहानी होण्याचा धोका असल्याने यावर ताबडतोब उपाययोजना करावी, अशी मागणी आ. पाटील यांनी केली.
माढा तालुक्यात बिबट्याच्या दहशतीमूळे पशुपालकांतून घबराहट निर्माण झाली आहे. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने विविध प्रकारे प्रयत्न केले मात्र बिबट्या अद्याप जेरबंद झाला नाही.