

सोलापूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चेतन सोमा (रा. जुना विडी घरकुल, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या (वय 14) आईने फिर्याद दिली आहे. जानेवारी 2025 पासून चेतन हा सतत पीडित मुलीचा पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिच्या आईने आपल्या भावाला या प्रकाराची माहिती दिली होती. त्यांच्या भावाने चेतन याच्या बहिणीला फोनवरून या प्रकाराबाबत सांगितले होते. गुरुवारी (दि. 17 जुलै) दुपारी दोनच्या सुमारास पीडित मुलीच्या शाळेतील शिक्षिकेने तिच्या वडिलांना फोन केला. पीडीतेची तब्येत ठीक नाही त्यामुळे ती चेतन सोमा हा माझा भाऊ आहे त्याच्यासोबत जाते असे सांगून गेली आहे, अजून शाळेत परतली नाही असे शिक्षिकेने वडिलांना सांगितले.
त्यावर तिच्या वडिलांनी तिला फोन करून विचारल्यावर तब्येत ठीक नसल्याने शिक्षिकेने चेतन सोमा याच्यासोबत दवाखान्यात पाठवल्याचे सांगितले. त्यावरून सोमा याने पीडीतेला कोठेतरी नेल्याची तिच्या आईवडिलांना खात्री झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास ती घरी परतली. ती घाबरलेल्या स्थितीत होती. चेतन याने शाळेत येऊन तिला जुना विडी घरकुलमध्ये नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या आईने जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक शेख करीत आहेत.