

सोलापूर : सिद्धेश्वर तलावामध्ये मासे आणि कासव मृत्युमुखी पडण्याचा प्रकार सुरूच आहे. गेल्या महिनाभरात शेकडो मासे आणि कासवांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची दखल पर्यावरण व वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली आहे. या प्रकरणाचा तपास करून वस्तुनिष्ठ अहवाल तत्काळ सादर करावा, असा आदेश महापालिकेला देण्यात आला आहे.
सिद्धेश्वर तलावात 8 मे रोजी 55 कासवांचा मृत्यू झाला. त्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. सोमवारी पुन्हा मेलेल्या माशांचा खच आढळून आला. पाण्यात रासायनिक घटकांचा समावेश आहे. ऑक्सिजनचे प्रमाण घटले आहे. त्यामुुळे जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. यासंदर्भात आ. देवेंद्र कोठे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना 26 मे रोजी पत्र पाठवत सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील सिद्धेश्वर तलावासाठी निधी देण्याची मृत कासव आणि माशांचा मृत्यूची कारणे शोधण्याची मागणी केली होती.
कोठेंच्या पत्राची दखल घेत मंत्री मुंडे यांनी महापालिका प्रशासनास याबाबत पत्र पाठवले आहे. कासव व मासे मरण्याच्या घटनेबाबत तातडीने तपासणी करत घडलेल्या घटनेचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत.
महापालिका प्रशासन आणि सिध्देश्वर देवस्थानकडून या प्रकरणात टोलवाटोलवी केली जात आहे. 55 कासवाचा अहवालही लपवला जात आहे. पाण्यात चुन्याची निवळी मिसळली. कारंजे सुरु करण्यात आले. तलावच्या काठ, पाण्यातील कचरा गोळा करत तलाव स्वच्छ केला गेला. या उपाययोजनाचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. मासे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडतच आहेत.