

सोलापूर/सांगोला : सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.6 अशी होती. सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी हे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील सांगोला हे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने एक्स या सोशल माध्यमावर प्रसिद्ध केली.
हा भूकंप पाच किलोमीटर खोलीवर झाला आहे. याची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. सांगोला तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यामध्येही हे भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे.
1993 मध्ये किल्लारी येथे झालेल्या भूकंपावेळी सोलापूर जिल्ह्यातही भूकंप झाला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात भूकंप झाला आहे. सांगोला तालुक्याच्या शेजारी असलेल्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातही हा भूकंप जाणवल्याचे सांगितले जात आहे. सांगोला हे भूकंपाचे केंद्र असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितले.