

वाशिंबे : गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व धरण अद्याप तुडुंब भरून असल्यामुळे आपले आगमन लांबणीवर टाकलेल्या स्थलांतरित पक्ष्यांपैकी समुद्रपक्षी (सीगल्स) उजनी काठावर दाखल झाले आहेत. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी नुकतेच उजनी परिक्रमा करुन ही माहिती दिली.
कोंढारचिंचोली, टाकळी, कात्रज, पोमलवाडी, केत्तूर, काळेवाडी, पळसदेव आदी उजनीच्या काठावरील गावांच्या विस्तृत पाण्यावर मासेमारी करत हे पक्षी तरंगताना दिसत आहेत. दक्षिण रशिया, पूर्व मंगोलिया, पॉलिआर्क्टिक, हिमालयातील मानसरोवर तसेच लडाख भागातील सरोवराला वीण घालणारे व सागरी किनाऱ्यावर मासेमारी करणारे विविध प्रजातींचे गलपक्षी उजनी जलाशयावर दरवर्षी हिवाळ्यात येतात. त्यापैकी ‘ब्लॅक हेडेड गल’ मागील आठवड्यात येऊन दाखल झाले आहेत.
धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरलेले असून माशांच्या निकोप वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या माशांवर उदरनिर्वाह करण्यासाठी सिगल पक्ष्यांबरोबर नानातऱ्हेची बदके येऊन दाखल होतील, असा अंदाज आहे. एरवी खाऱ्या पाण्यातील माशांची चव चाखण्यात व्यस्त असणारे हे मत्स्याहारी पक्षी उजनीतील गोड्या पाण्यातील माशांवर डल्ला मारण्यात सक्रीय झाल्याचे पाहून पक्षी निरीक्षकांत उत्साह वाढला आहे.