

सोलापूर : डीजेच्या आवाजाची पातळी मोजण्यासाठी आता पोलिसांवर अवलंबून राहण्याची अजिबात गरज नाही. तुमच्या मोबाईलवर प्ले स्टोअर मधून साउंड मीटर, डेसिबल मीटर, साउंड डेसिबल मीटर यापैकी कोणताही अॅप डाउनलोड करा. त्यावर आवाजाची पातळी मोजा अन् थेट पोलिसांना 112 क्रमांकवर फोन करून तक्रार करा. याशिवाय आपले सरकार, पीएमओ यासारख्या अॅपवरही तुम्ही तक्रार करून या भीषण, भयंकर प्रकाराकडे व्यवस्थेचे लक्ष वेधू शकता. यातून प्रत्येक सोलापूरकर दैनिक ‘पुढारी’च्या डीजे विरोधी मोहिमेला आणखी तीव्र करू शकतो. त्यामुळे आता सोलापूरकरांचा एकच निर्धार ‘डीजेमुक्त सोलापूर’.
डीजेच्या भीषण आवाजाविरुद्ध दैनिक ‘पुढारी’ने मार्च महिन्यापासून भूमिका घेत वेळोवेळी वृत्त, स्तंभ, विशेष लेख प्रसिद्ध केले आहेत. डीजेच्या विरुद्धच्या प्रक्षुब्ध लोकभावना ‘पुढारी’ने वेळोवेळी प्रसिद्ध केल्या आहेत. यामुळे आता डीजे विरोधी मोहीम तीव्र झाली आहे. ती आता आणखी तीव्र करण्यासाठी सोलापूरकरांनी टेक्नोसेव्ही होत, कृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘आता नाही तर, पुन्हा कधीच नाही’ अशी डीजेविरुद्धची मोहीम अगदी अंतिम टप्प्यावर आली आहे. अशावेळी समस्त सोलापूरकरांनी मागे न राहता, ‘पुढारी’च्या या लढ्यात कृतीयुक्त सहभाग नोंदवण्याची गरज आहे.
दैनिक ‘पुढारी’च्या डीजे विरोधी मोहिमेला आणखी तीव्र करा
फक्त तीन स्टेप्स अन् डीजेमुक्त सोलापूर
- मोबाईलच्या प्ले स्टोअर मधून साउंड मीटर, डेसिबल मीटर, साउंड डेसिबल मीटर अॅप डाउनलोड करा
- अॅप ओपन करून आवाजाच्या स्रोताजवळ फोन न्या. तेव्हा स्क्रीनवर गेज किंवा आलेखाद्वारे डीजेच्या आवाजाची पातळी दिसेल.
- ती आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त आढळल्या 112 क्रमांकावर पोलिसांना कळवा, आपले सरकार अॅपद्वारे राज्य शासनाच व पीएमओ अॅपद्वारे थेट केंद्र सरकारच्या यंत्रणेलाही कळवा.
पोलिस, यंत्रणा नाही म्हणण्याचे दिवस गेले
शासकीय परवानगी घेऊन जरी कुणी डीजे लावला असला तरी, त्याची आवाजाची पातळी मोजण्यासाठी पोलिस नाही, यंत्रणा नाही म्हणून सहन करण्याचे दिवस आता गेले. डीजेच्या या राक्षसी आवाजाची पातळी मोबाईलवर मोजण्याचा पर्याय प्रत्येकाला खुला आहे.
आवाजाच्या मर्यादा
(दिवसा आणि रात्री या क्रमाने)
औद्योगिक - 75 व 70 डेसिबल
व्यावसायिक - 65 व 55 डेसिबल
रहिवासी - 55 व 45 डेसिबल
सायलेन्स झोन - 50 व 40 डेसिबल
ध्वनी प्रदूषण नियम 2000 या कायद्यानुसार विविध परिसरांमध्ये आवाजाची ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
या आवाज क्षमतेपेक्षा जास्त डेसिबलचा वापर झाल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.
न्यायव्यवस्थेने दिला अधिकार
सार्वजनिक जीवनात, घरात आरामात, शांतपणे राहू इच्छिणार्या नागरिकाला डीजेच्या आवाजापासून संरक्षित राहण्याचा मूलभूत अधिकार आहे. तसेच ध्वनी प्रदूषणाचा अधिकार कुणालाही नाही. असे भारतीय न्यायव्यवस्थेने म्हटले आहे. ज्यामुळे सामान्यांच्या जीवनात अडथळा येतो, त्याचा उपद्रव होतो त्यासाठी काही कायदे आणि अनेक निर्णय आहेत जे नागरिकांना ध्वनी प्रदूषणमुक्त वातावरणात राहण्याच्या अधिकाराचे संरक्षण करतात.