

टेंभुर्णी : येथील औद्योगिक वसाहतीमधील केळी पॅकेजिंग मटेरियल बनविणार्या श्रीकृष्ण एक्सपोर्ट कंपनीस सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागून फोम व पॅकेजिंग कच्चे व पक्के मटेरियल, मशिनरी, संगणक आदी साहित्य जळून भस्मसात झाले. या घटनेत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीत श्रीकृष्ण केळी एक्स्पोर्ट नावाची कंपनी 15 हजार स्क्वे.फूट प्रशस्त जागेत असून मुख्य कार्यालय भोपाळ येथे आहे. टेंभुर्णीतील कंपनीत केळीसाठी पॅकेजिंग मटेरियल तयार केले जाते. आग लागली त्यावेळी कंपनीत दहा कर्मचारी काम करीत होते. आग लागल्याचे कळताच सर्वजण वेळीच बाहेर पळाले. यामुळे जीवितहानी झाली नाही. आग विझविण्यासाठी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे दोन बंब, कुर्डुवाडी नगरपालिकेचा एक बंब व श्रीपुर येथील पांडुरंग सह.साखर कारखान्याच्या एका
अग्निशमन बंबाने आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र आग एवढी भीषण होती,यामुळे दूरवर आगीचे लोळ उठत होते. उष्णतेने दूरवरून पाणी मारण्याचे काम करावे लागत होते.शेड मोठे असल्याने पाणी मध्यापर्यंत पोहचत नव्हते.सुरुवातीस एकच बंब आला होता.तसेच अग्निशमन बंबात पाणी भरण्यासाठी येथे कसलीही यंत्रणा नसल्याने अडचणीत आणखी भर पडली. यामुळे पाणी संपले की,विठ्ठलराव शिंदे कारखाना येथून पाणी भरून आणण्यात येत होते. आग लागली त्यावेळी कंपनीचे संचालक सचिन खुळे,लेडीज कर्मचार्यासह दहा कर्मचारी काम करीत होते.या कंपणीचे शटर आपोआप बंद होते.मात्र प्रसंगावधान दाखवून वेळीच हालचाल केल्याने जीवित हानी झाली नाही. टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी बघ्यानी एकच गर्दी केली होती.
टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीत अग्निशमन यंत्रणा नसल्याने यापूर्वीही अनेक कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. मात्र देशात एक नंबरवर असलेले महाराष्ट्र शासन साधी अग्निशमन यंत्रणा, पुरेशा पाणीपुरवठा देऊ शकत नाही. यामुळे 20 दिवसांत अग्निशमन यंत्रणा द्यावी. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा टेंभुर्णी एमआयडीसीचे अध्यक्ष राजेंद्र ढेकणे यांनी दिला आहे.