

सोलापूर : अरण्यऋषी, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मारुती भूजंगराव चितमपल्ली यांच्यावर गुरुवारी (दि. 19) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास रुपाभवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.
चितमपल्ली यांचे बुधवारी (दि. 18) सायंकाळी 7.50 वाजता वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले होते. अक्कलकोट रोडवरील सूत मिल हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. हिंदू स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. यावेळी पोलिस विभागाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून चितमपल्ली यांना मानवंदना दिली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त एम. राजकुमार व उपस्थित लोकप्रतिनिधींनी चितमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले. चितमपल्ली यांचे पुतणे श्रीनिवास चितमपल्ली यांनी मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला. यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, साहित्यिक डॉ. सुहास पुजारी, कवी मारुती कटकधोंड, वैज्ञानिक व्यंकटेश गंभीरे, बाळासाहेब चितमपल्ली, श्रीकांत चितमपल्ली, वन विभागाचे विभागीय अधिकारी मनिषा पाटील, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी अजित शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी शुभांगी जावळे, वन विकास अधिकारी रोहितकुमार गांगर्डे, नान्नज वनपाल गुरुदत्त दाभाडे, वनजीव संरक्षक भारत छेढा, डॉ. निनाद शहा, पद्माकर कुलकर्णी, डॉ. श्रीकांत कामतकर यांच्यासह चितमपल्ली यांचे कुटुंबीय, नातेवाईक, साहित्यिक, मित्रपरिवार उपस्थित होते.
पार्थिवाला मानवंदना दिल्यानंतर भडाग्नी देण्याची प्रक्रिया सुरु होती. त्याचवेळी आभाळातून मेघराजाने हजेरी लावत अश्रू ढाळले.
चुंगी (ता. अक्कलकोट) येथील हलगी पथक हलग्यांचा कडकडाट करत अंत्ययात्रेत सहभागी झाले. हाताने नारळ फोडून कला सादर केली. चितमपल्ली यांच्या अंत्यसंस्कार यात्रेत त्यांच्या पुस्तकांच्या कव्हरचे तोरण बांधले होते. अंबादास कनकट्टी यांनी मोर, कावळा यासह अन्य पक्ष्यांचे आवाज सादर करून श्रद्धांजली वाहिली.