

सोलापूर : मराठा आणि कुणबी एकच आहेत. याबाबतचा शासन निर्णय तातडीने सरकारने काढावा, अन्यथा मुंबई सोडणार नाही. शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावी. 27 ऑगस्टच्या आत निर्णय जाहीर करावा, अन्यथा होणार्या परिणामांना सरकार जबाबदार राहील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी राज्य शासनास दिला.
मनोज जरांगे हे बुधवारी 6 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हा दौर्यावर आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. जरांगे म्हणाले, यापूर्वी आपण मुंबईला गेलो होतो. त्यावेळी मुंबई गाठण्यापूर्वी सरकारने आपल्याला आरक्षणाचे आश्वासन देऊन परत पाठवले. त्यानंतर आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, सरकारने आपली फसवणूक केली. आता यापुढे कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. आरक्षणासाठी आपण 29 ऑगस्ट पर्यंत च्या आंदोलनावर ठाम आहे 27 ऑगस्ट रोजी सकाळी अंतरवली सराटी येथून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मराठा समाजातील युवकांनी नागरिकांनी, आया बहिणींंनी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे, मुंबईच्या दिशेने एक दिवस यावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
राज्यात 58 लाख जणांच्या कुुणबी नोंदी सापडल्याचा अहवाल सरकारच्या समितीने दिला आहे. हा अहवाल सरकारकडे आहे. त्यामुळे सरकारने आता उर्वरित सर्व मराठ्यांचा कुणबीत समावेश करावा, अशी मागणी देखील जरांगे यांनी यावेळी केली. हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचे गॅजेट आणि बॉम्बे गॅजेट याचा आधार घेऊन कुणबी मराठा आरक्षणासाठी अंमलबजावणी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. सातारा गॅजेट नुसार संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र यात बसत असल्याचे त्यांनी सांगितले.