

मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील हैदराबाद गॅझेटमध्ये अंतर्भूत नसलेल्या मात्र हैदराबाद संस्थांमधील जिल्ह्यातील ५८ गावांचा हैदराबाद गॅजेटमध्ये सहभाग करावा. या मागणीसाठी मोहोळ येथील ॲड.श्रीरंग लाळे यांच्यासह इतरांनी आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या सोबत चर्चा करून हैदराबाद गॅजेटमध्ये या ५८ गावांच्या नोंदींचा समावेश करण्याची मागणी केली.
रविवारी ३१ ऑगस्ट २०२५ रोजी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे-पाटील यांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मुंबईचे ॲड. आशिष गायकवाड,सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे ॲड.श्रीरंग लाळे , प्रा.श्रीमंत कोकाटे, साताऱ्याचे राजेंद्र निकम,व इतर अभ्यासकांसोबत मराठा- कुणबी व कुणबी- मराठा, राज्यातील विविध गॅझेट व आरक्षणाच्या इतर मुद्द्यांच्या संदर्भात चर्चा केली.
सोलापूर जिल्ह्यातील या ५८ गावांच्या कुणबी नोंदीच्या बाबत माऊली पवार यांच्या समन्वयाखाली टीम काम करत असल्याबाबत ही चर्चा केली. सदरच्या ५८ गावांचे बाबत पंडित ढवण यांनी काही महत्त्वाचे दस्तऐवज उपलब्ध करून दिले. मोहोळ तालुक्यातील टीम यासंदर्भात सक्रियपणे कार्यरत आहे. यामध्ये वाळूज, देगाव (वा.), एकुरके, मसले चौधरी अशा अनेक गावांचा समावेश आहे.
या आंदोलनामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत ठामपणे उभे राहू. हैदराबाद गॅजेटमध्ये 'त्या ५८ गावांच्या ' नोंदींचा समावेश करण्याच्या अनुषंगाने सरकारकडे मागणी केली पाहिजे अशी विनंती आम्ही केली आहे. "
- ॲड.श्रीरंग लाळे, मराठा समन्वयक मोहोळ