

मंगळवेढा : मंगळवेढा-पंढरपूर पालखी मार्गावर एसटी बस आणि पिकअप जीप यांच्यात झालेल्या धडकेत जीप चालकाचा जागीच मृत्यू झाला. एसटीतील सहा शाळकरी विद्यार्थ्यांसह बस चालक जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास मंगळवेढा-पंढरपूर रोडवर झाला.
अविनाश पुजारी (वय 24, रा. लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत झालेल्या जीप चालकाचे नाव आहे. एसटी चालक अशोक सिधराया पाटील व जीप चालकाबरोबर असलेला अरुणकुमार पाटील (रा. सातलगाव, ता. इंडी) हे किरकोळ जखमी झाले.
मंगळवेढा आगाराची गुंजेगाव- मंगळवेढा ही बस (क्र.एम. एच. 14 बी. टी. 4427) गुंजेगाववरून शाळकरी मुलांसमवेत मंगळवेढ्याकडे येत होती. पंढरपूर रोडवरील सुगरण हॉटेल जवळील पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना बसने पिकअप जीप (क्र. एम. एच. 12 एस. एक्स. 7328) ला धडक दिली. त्या धडकेत जीप चालक अविनाश पुजारी याचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासमवेत असलेले अरूणकुमार पाटील जखमी झाले. एसटीचा चालकासह बसमधील सहा शाळकरी विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.
घटनास्थळी आगार व्यवस्थापक संजय भोसले व पोलीस तुकाराम व्हरे तात्काळ दाखल झाले. जखमींना मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले.