Mangalwedha municipality: मंगळवेढा नगरपालिकेची तीन दिवसांत 29 लाखांची वसुली

थकबाकीदारांवर मंगळवेढा पालिकेचा करडा बडगा; नळतोडणीसह धडक कारवाई
Mangalwedha municipality
Mangalwedha municipalityPudhari
Published on
Updated on

मंगळवेढा : सुविधा हव्या, पण कर नको या प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी मंगळवेढा नगरपालिकेने अखेर आक्रमक पवित्रा घेतला आहे. तब्बल 2 कोटी 24 लाखांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी राबवलेल्या विशेष मोहिमेत अवघ्या तीन दिवसांत 29 लाख 43 हजार 996 रुपयांची वसुली करत पालिकेने थकबाकीदारांना चांगलाच धक्का दिला आहे. 31 मार्च रोजीही शहरभर ही मोहीम अधिक तीव्रतेने सुरूच होती.

गेल्या चार वर्षांत प्रशासकराज आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे कर वसुलीचे काम अक्षरशः रखडले होते. परिणामी थकबाकीचा आकडा कोट्यवधींवर जाऊन पोहोचला. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर लोकप्रतिनिधी सत्तेत आल्यानंतर प्रशासनाने ‌‘आता कोणतीही सवलत नाही‌’ अशी भूमिका घेत थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपट्टी थकवणाऱ्यांवर पालिकेने थेट नळतोडणीची मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांच्या घरांवर धडक देत पथकांनी पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, अनेकांनी तातडीने थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे.

घरपट्टीची थकबाकी 1 कोटी 23 लाख 65 हजार 616 रुपये, तर पाणीपट्टीची थकबाकी 1 कोटी 1 लाख 4 हजार 438 रुपये इतकी प्रचंड आहे. या थकबाकीमुळे पालिकेच्या विकासकामांवर मोठा परिणाम होत असून, अनेक प्रकल्प निधीअभावी रखडण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई असतानाही मंगळवेढा शहरवासीयांना त्या झळा बसू नयेत, म्हणून पालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत ठेवला. मात्र सुविधा मिळूनही कर भरण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने प्रशासनात नाराजी व्यक्त होत आहे. करनिरीक्षक महानंदा धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली गोरख काकडे, सागर गडेकर, युनूस मोगल, हरीप्रसाद देवकर, अजय माने, अशोक डोके, वसंत वाघमोडे यांच्या पथकांनी शहरात धडक मोहीम राबवली.

काही ठिकाणी थकबाकीदारांकडून कर्मचाऱ्यांशी अरेरावी करण्यात आली. तरीही कर्मचाऱ्यांनी संयम राखत आपली कारवाई सुरू ठेवली. नगरपालिकेकडून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी निधी आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला कर वेळेत भरणे ही जबाबदारी आहे, असे आवाहन करनिरीक्षक महानंदा धुमाळ यांनी केले आहे. पालिकेच्या या आक्रमक मोहिमेमुळे शहरात आता ‌‘कर भरा नाहीतर कारवाईला सामोरे जा‌’ असा स्पष्ट संदेश गेला असून, पुढील काही दिवसांत वसुलीचा वेग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news