

मंगळवेढा : मंगळवेढा आगाराने डिसेंबर महिन्यात विविध मार्गांवर केलेल्या फेऱ्यांमधून 10 लाख 10 हजारांचे उत्पन्न मिळवून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.
सध्या आगाराकडे 61 बसेस कार्यरत असून या बसेसच्या माध्यमातून विविध मार्गांवर 384 फेऱ्या केल्या जातात. प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी आगाराकडे 136 चालक असून 97 वाहक आहेत. तब्बल 25 वाहकांची संख्या कमी असतानादेखील मंगळवेढा आगाराने जिल्ह्यात उत्पन्नात आघाडी घेतली. गतवर्षी एसटीची संख्या कमी, त्यामध्ये विविध मार्गांवर बसचा खोळंबा होण्याचे प्रमाणदेखील जास्त होते. पुणे-मुंबईला जाणारे प्रवाशी मंगळवेढा बसेसमधून प्रवास न करता पंढरपुरातून व अन्य बसेसचा पर्याय निवडत होते. अशा परिस्थितीतही आगाराने उत्पन्नात सातत्य ठेवले. आगाराला नुकत्याच नवीन दहा बसेस उपलब्ध झाल्यामुळे चांगली सुविधा देणे सुरुवात झाली.
याशिवाय सध्या डिसेंबर महिन्यात तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालय व शाळांच्या सहली कोकणात व मराठवाड्यात गेल्यामुळे या सहलीतूनही उत्पन्न मिळवले. महिला सन्मान योजनेत 2 लाख 29 हजार 347 महिला प्रवाशांनी तर अमृतमध्ये 1 लाख 1 हजार 142 वयोवृद्धांनी, 14 हजार 163 मुलांनी तर 18 हजार 903 ज्येष्ठ नागरिकांनी प्रवासाचा लाभ घेतला. आगाराने सध्या प्रवाशांच्या मागणीनुसार बसेसची सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दर अमावास्येला मंगळवेढा-आदमापूर मार्गावर एसटी बसेसची व्यवस्था केल्याने शहर व तालुक्याच्या दक्षिण भागातील बहुतांश भाविकांची आदमापूरच्या बाळूमामा दर्शनाची सोय झाली आहे. तर मंगळवेढ्यातील बहुतांश नागरिकांचे कुलदैवत सोनारी (परंडा) येथील असल्यामुळे याठिकाणी जाण्यासाठी दर पौर्णिमेला गाडीची व्यवस्था केली. या गाडीला नुकताच चांगला प्रतिसाद मिळाला. अशा वेगवेगळ्या माध्यमातून उत्पन्नवाढीचे उपक्रम राबवल्यामुळे आगाराने उत्पन्नात झेप घेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. सध्या आगाराला आणखीन पाच बसेसची आवश्यकता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिल्यास आगारामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीची सुविधा देता येणार आहे.