Anil Sawant: मंगळवेढ्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे तत्काळ भरा

अनिल सावंत यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी
Anil Sawant: मंगळवेढ्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे तत्काळ भरा
Published on
Updated on

मंगळवेढा : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये सध्या २७ पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे ती रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी भैरवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

पंढरपूर येथील आषाढी वारी २०२६ च्या पूर्वतयारीच्या पाहणीसाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आले होते. त्यावेळी हे निवेदन देण्यात आले. तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपकेंद्रातील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर आवश्यक पदे विशेष भरती मोहिमेद्वारे तत्काळ भरणे गरजेचे आहे. तालुक्यात नव्याने उपकेंद्र बांधकाम पूर्ण होऊनदेखील त्याठिकाणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नसल्यामुळे त्या भागातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा लाभ मिळत नाही. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी रुग्णालयातील होणारी लूट पाहता तालुक्यातील सध्या आरोग्यावस्था कमकुवत झाली असून त्या संदर्भात अनिल सावंत यांनी पावसाळ्याच्या तोंडावर केलेली मागणी महत्त्वपूर्ण आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेमध्ये डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ तसेच इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध होत नसून, सर्वसामान्य रुग्णांची सातत्याने गैरसोय व हेळसांड होत आहे. नुकत्याच नागपूर–रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शेलवाडी (ता. मंगळवेढा) येथे झालेल्या अपघातातील मृत वृद्धाच्या शवविच्छेदनासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने आंधळगाव येथे प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही.

परिणामी संबंधित मृतदेह मंगळवेढा येथे हलविण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेमुळे शोकाकुल कुटुंबीयांना अनावश्यक मानसिक त्रास सहन करावा लागला. ही घटना ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील मनुष्यबळाच्या गंभीर कमतरतेचे द्योतक असून, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news