

मंगळवेढा : तालुक्यात सध्या लग्न ठकवणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी लेंडवे चिंचाळे येथील तरुणाला लुटल्याची घटना ताजी असतानाच, आता भोसे (बावची) येथे रत्नागिरी जिल्ह्यातील लुटेरी दुल्हनने पहिल्या पतीला आणि पोटच्या पोरीला लपवून, एका निष्पाप तरुणाच्या गळ्यात लग्नाची माळ घातली. वर पक्षाकडून 1 लाख 53 हजार रुपये रोख आणि दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण लाटून पोबारा केला.
संशयित आरोपी अश्विनी मारुती धानोळे (रा. देवरुख, ता. संगमनेर, जि. रत्नागिरी) हिला पुढे करून पिंटू ऊर्फ नाना कोळेकर, शिवाजी गंगाराम कोळेकर आणि युवराज कांबळे (सर्व रा. रेडी, ता. मंगळवेढा) या एजंटांनी जाळे विणले. फिर्यादीच्या भोसे येथील राहत्या घरी 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.30 च्या शुभमुहूर्तावर अक्षता पडल्या.
मात्र हा मुहूर्त वधूपक्षासाठी नाही, तर लुटारू टोळीसाठी कमाईचा ठरला. लग्न लावून देण्याच्या नावाखाली आरोपींनी 1 लाख 53 हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने आपल्या खिशात कोंबले. दोन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली असून, या प्रकरणातील फरार आरोपी शिवाजी कोळेकर आणि युवराज कांबळे यांचा पोलिस शोध घेत आहेत.