

सोलापूर : सोलापूर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, सांगली शहर, मुबंई शहर, ठाणे शहर यासह अन्य आंतर जिल्ह्यातून चोरलेल्या 35 दुचाकीसह आरोपीला जेरबंद केले. ही कारवाई जेलरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने केल्याची माहिती पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून 31 ऑक्टोबरला जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलिस कर्नचारी युवराज गायकवाड व उमेश सावंत यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सीसीटिव्हीची फुटेज पाहिले असता एकजण चोरीतील दुचाकी विक्रीसाठी शनिवार पेठेत आल्याची माहिती मिळाली.
गुन्हे शाखेचे सपोनि संदीप पाटील व अंमलदार यांनी तेथे सापळा लावला असता तो व्यक्ती मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता विविध ठिकाणावरून त्याने 35 दुचाकी चोरल्याचे सांगितले. तसेच, चोरीस गेलेली एम. एच. 13 डी. एल. 5856 ही दुचाकीही मिळुन आली. शंकर भरत देवकुळे (रा. मु.पो. वैराग रोड, ता. धाराशिव जि. धाराशिव) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडील 35 दुचाकीसह एकूण दहा लाख 98 हजार रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार, सपोनि संदीप पाटील,एम. डी. नदाफ, शरीफ शेख, गजानन कणगिरी, धनाजी बाबर, अब्दुल वहाब शेख, वसंत माने, भारत गायकवाड, उमेश सावंत, युवराज गायकवाड, संतोष वायदंडे इकरार जमादार, कल्लप्पा देकाणे, राजपाल फुटाणे, विठठल जाधव, साईनाथ यसलवाड, प्रकाश गायकवाड, मच्छिद्र राठोड, अयाज बागलकोटे, अर्जुन गायकवाड यांनी केली आहे.