

सोलापूर : शहरातील दमाणी नगर परिसरातील महसूल कर्मचारी संघटनेच्या इमारतीत एका व्यक्तीने तब्बल सहा ते सात महिने ठिय्या मांडला होता. महसूल आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या इसमाकडून घराचा ताबा घेतला. त्याने स्वतःहून साहित्य काढून नेल्याने महसूल विभागाने त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही.
शहरातील दमाणी नगर परिसरात महसूल कर्मचारी संघटनेची इमारत आहे. या इमारतीत गेल्या सहा ते सात महिन्यांपासून एका इसमाने कब्जा केला होता. ही गोष्ट महसूल कर्मचार्यांना समजल्यावर त्यास इमारत खाली करण्यास सांगितले. मात्र त्या इसमाने मी गेली वीस वर्षे या इमारतीत रहात असल्याचे सांगत उलट त्यांनाच दमबाजी केली. यानंतर जिल्हाधिकार्यांनी उत्तर तहसीलदारांना पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले.
त्यानुसार उत्तर तहसीलदारांनी पथक तयार करून फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने त्या इमारतीवर मंगळवारी छापा टाकला. यामध्ये अक्षय सरोळे नामक व्यक्ती त्या इमारतीत अवैधरीत्या रहात असल्याचे आढळून आले. त्याला इमारत खाली करण्यास बजावले नाहीतर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पथकाने दिला. लागलीच अक्षय याने इमारत खाली करण्याचे मान्य करीत इमारती मधील बेड, टीव्ही, फ्रिज यासह इतर साहित्य टेम्पोने इतरत्र हलविले, राहिलेले सामान महसूल पथकाने पंचनामा करून ठेवले. या पथकात नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, मंडल अधिकारी भीमाशंकर भुरळे, कर्मचारी कल्याण निधीचे व्यवस्थापक तळभंडारे, सदस्य शंतनू गायकवाड यांचा सहभाग होता.