

पंढरपूर : बेकायदेशीररित्या, विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) घेऊन फिरणार्या एकजणाला पंढरपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने कौठाळी (ता.पंढरपूर) येथ्ून ताब्यात घेतले. त्याच्याविरूद्ध गुरूवारी (दि. 27) शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरविंद भीमराव आटकळे (रा.कौठाळी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याकडे कार्यरत असलेल्या परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांना बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जुना अकलूज रोडवरील बाह्यवळण पुलाखाली यातील अरविंद आटकळे हा विनापरवाना अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तत्काळ त्यांनी पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, हवालदार पठाण, मुलाणी, पोलिस कॉ. अजित मिसाळ यांच्या पथकाला त्याठिकाणी पाठवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार रात्री 11.20 वाजण्याच्या सुमारास पोलिस पथक बाह्यवळण पुलाजवळ पोहोचले. मात्र, त्यांची कुणकुण लागताच आटकळे हा पळून जाऊ लागला.
मात्र, पोलिसांनी त्याला पकडून झडती घेतली असता त्याच्या कमरेला पँन्टमध्ये खोचलेले सुमारे 35 हजार रूपये किंमतीचे मॅगझिनसह देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) सापडले. त्यासाठीचा परवाना त्याच्याकडे नसल्याचे स्पष्ट झाल्याने तत्काळ त्याला ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. अधिक तपास पोलिस करीत आहेत.