

करमाळा : करमाळा शहरातील मौलाली नगर येथील रेणुका नगर भागामध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास बंदी असलेले प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणार्या तरुणाला करमाळा पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले आहे. रणजीत राजू मोरे ऊर्फ मलिंगा (वय 21, रा. रेणुका नगर, ता. करमाळा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
मलिंगा याला प्रतिबंधित इंजेक्शन विक्री करत असलेल्या संशयित आरोपी विजय विलास क्षीरसागर (रा. करमाळा) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार झाला आहे. रणजित ऊर्फ मलिंगा मोरे यांच्याकडून 17 हजार 800 रुपये किमतीच्या 11 बॉक्समधून 55 बाटल्या जप्त केले आहेत. रणजित ऊर्फ मलिंगा मोरे याला करमाळा न्यायालयासमोर उभा केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. याची फिर्याद करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस वैभव ठेंगील यांनी करमाळा पोलिसांत दिली आहे.
करमाळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित इंजेक्शनची राजरोस विक्री होत असल्याची माहिती करमाळा पोलिसांना लागली होती. पुन्हा करमाळा शहरांमध्ये असाच प्रकार सुरू झाला होता. याची खबर पोलिसांना मिळाली. त्यावरून एक पथक तयार करत वेशांतर करून सापळा रचला. यावेळी प्रतिबंधित इंजेक्शन विक्री करणारा रणजित विक्री करताना आढळला. त्यास जागीच पकडून अटक केली. याबाबत या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संदेश चंदनशिव हे करीत आहे.