

माळशिरस : माळशिरस पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय मगर तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या मनीषा पाटील यांची मतदानाद्वारे निवड करण्यात आली आहे.
माळशिरस पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी गुरुवार, दि. 12 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सकाळी 11 वाजता सभापती पदासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय मगर व भाजपच्या ऋतुजा पराडे-पाटील यांनी तर उपसभापतीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे मनीषा मदने-पाटील तर भाजपतर्फे आनंद शेंडगे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
त्यानंतर वैष्णवीदेवी मोहिते-पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर दुपारी 2 वाजता सर्व नवीन सदस्यांची सभापती, उपसभापती निवडीसाठी बैठक घेण्यात आली. सभापतीपदासाठी दोन व उपसभापती पदासाठी दोन अर्ज आल्याने हात उंच करून मतदान घेण्यात आले. यावेळी सभापती पदासाठी दत्तात्रय मगर यांना 12 सदस्यांनी पसंती दिली. तर ऋतुजा पराडे-पाटील यांना 6 सदस्यांनी पसंती दिली.
त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय मगर यांची सभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर केले. उपसभापती पदासाठी दोन अर्ज असल्याने त्यासाठी हात उंच करून मतदान घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मनीषा पाटील यांना 12 सदस्यांनी पसंती दर्शवली तर भाजपचे आनंद शेंडगे यांना 6 सदस्यांनी पसंती दर्शवली. त्यामुळे उपसभापती पदी मनीषा पाटील यांची निवड जाहीर केली. सभापती दत्तात्रय मगर व उपसभापती मनीषा पाटील यांना दत्तात्रय मगर, मनीषा पाटील, वैष्णवीदेवी मोहिते- पाटील, विमल जानकर, निशा गिरमे, युवराज झंजे, रेश्मा माने, सोनाली पाटील, ॲड. प्रवीण वाघमोडे, मनीषा नाईकनवरे, आप्पासाहेब पाटील, महादेव साबळे तर ऋतुजा पराडे-पाटील व आनंद शेंडगे यांना ऋतुजा पराडे-पाटील, आनंद शेंडगे, दत्तात्रय शेळके, तनुजा खिलारे, राजश्री रुपनवर, नम्रता पुकळे यांनी मतदान केले.
मोहिते-पाटील व आ. जानकर गटाने पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना शिंदे गट यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 सदस्य, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 व शिवसेना शिंदे गटाचे 2 असे 12 सदस्य निवडून आले होते. तर भाजपचे 6 सदस्य निवडून आले होते.
या निवडीनंतर नवीन सभापती व उपसभापती यांचा खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार उत्तमराव जानकर यांनी सत्कार केला. यावेळी अर्जुनसिंह मोहिते-पाटील, विष्णू नारनवर, मिलिंद सरतापे, प्रताप पाटील, मच्छिंद्र ठवरे, जीवन जानकर, माऊली पाटील, तुकाराम देशमुख, पांडुरंग वाघमोडे, यासह मोहिते-पाटील व जानकर गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.