

मळोली : मळोली (ता. माळशिरस) येथील चालू असलेली अवैद्य दारू, जुगार, मटका, गांजा, गुटखा हे सर्व अमली पदार्थ बंद व्हावेत, या मागणीसाठी मळोली गावातील सामाजिक कार्यकर्ते बलभीम जाधव यांनी 1 जानेवारीपासून बेमुदत उपोषण चालू केले आहे. त्यांना गावातून व बाहेरील विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा वाढत आहे.
मळोली गावातील अवैद्य दारू व इतर अमली पदार्थ यांचा अतिरेक इतका वाढला आहे की, सर्वसामान्य नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी वेळापूर पोलिस स्टेशन व उत्पादन शुल्क विभाग यांना वारंवार निवेदन व पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. केवळ तात्पुरत्या स्वरूपात कार्यवाही केली जात आहे. ही कार्यवाही अधिक कडक करून तीन गुन्ह्यांपेक्षा अधिक जास्त गुन्हे असणाऱ्यांना तालुक्यातून तडीपार करावे. या मागणीसाठी श्री बलभीम जाधव यांनी बेमुदत उपोषण चालू केले आहे. त्यास अनेक सामाजिक संघटनांनी व महिलांनी आपला पाठिंबा दिला आहे. प्रशासनाने या मागणीचा विचार नाही केल्यास आंदोलन अधिक तीव्र करून रास्ता रोको व विविध प्रकारची आंदोलने केली जातील, असे युवक वर्गातून बोलले जात आहे.
उपोषणाच्या पहिल्या दिवशी व्यसनमुक्त युवक संघटनेचे राज्याचे मार्गदर्शक विलासबाबा जवळ सातारा यांनी बलभीम जाधव यांची भेट घेऊन उपोषणास पाठिंबा व्यक्त केला. यावेळी विलासबाबा यांनी दारूबंदीसाठी शासन अति उदासीन असून केवळ गावातून उठाव झाला, तरच हे शक्य असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी एमएसईबीचे निवृत्त अभियंता प्रमोद भापकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजय पराडे, एकनाथ पराडे, आध्यात्मिक सेनेचे संजय पराडे तसेच व्यसनमुक्त युवक संघाचे माजी राज्यध्यक्ष शहाजी काळे दौंड यांनी भेट घेऊन आंदोलना बद्दल चर्चा केली. त्याचबरोबर गावातील महिला बचत गट, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.