

बार्शी : आई कामावर असलेल्या हॉटेलमध्ये तिला भेटून घराकडे परतणार्या एका 19 वर्षीय तरुणावर काळाने घाला घातला. भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सचिन नाना केवटे (वय 19, रा. राऊत चाळ, बार्शी) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास बार्शी-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील जामगाव (आ) शिवारात घडली.
याप्रकरणी हॉटेल शिवेंद्रचे व्यवस्थापक अक्षय चकोर (वय 31, रा. सुभाष नगर, बार्शी) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, मयत सचिन केवटे याची आई हॉटेल शिवेंद्र येथे कामाला आहे. शनिवारी दुपारी सचिन आपल्या आईला भेटण्यासाठी हॉटेलवर आला होता. आईची भेट घेऊन तो आपल्या मोटारसायकलवरून (क्र. एमएच 13 ईयू 7893) बार्शीच्या दिशेने निघाला होता. हॉटेलपासून काही अंतरावर समोरून येणार्या पिकअपने (चालक - जयराम श्रीराम ननवरे, रा. बोरगाव खुर्द) त्याच्या दुचाकीला भीषण धडक दिली.
या अपघातात सचिन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तालुका पोलिसांनी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.