

भोसे (क.) : शासनाचा मका खरेदी हमीभाव 2400 रुपये प्रतिक्विंटल असताना खासगी व्यापाऱ्यांकडून मात्र 1700 ते 1800 रुपये प्रति क्विंटल दरात खरेदी सुरू आहे. यात शेतकऱ्यांचा प्रति क्विंटल 600 रुपये तोटा होत आहे. याबाबत शासनाने पंढरपूर येथील मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
शासनाचा मकेचा हमीभाव हा 2400 रुपये आहे. असे असताना स्थानिक व्यापारी सध्या चांगल्या प्रतीची मका फक्त 1700 ते 1800 रुपये क्विंटल या दराने खरेदी करीत आहेत. म्हणजेच क्विंटलमागे जवळपास 600 रुपयांची लूट खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून करत आहेत.
फक्त पंढरपूर याठिकाणीच हमीभावाने मका खरेदी न करता मंडळनिहाय मका हमीभाव केंद्रे सुरू केली तर शेतकऱ्यांचा चांगला फायदा होईल, तसेच खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबून शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकणार आहे.
दरात इतकी मोठी तफावत असेल तर शासनानेच यावर तोडगा काढून बाजार समितीमार्फत तालुक्यातील मोठ्या गावात मका हमीभाव केंद्रे सुरू करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे. शासनाने करकंब, भाळवणी, कासेगाव व तालुक्यातील इतर मोठ्या गावांमध्ये हमीभावाने मका खरेदी केंद्रे करावी, अशी मागणी तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.