सोलापूर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे राज्यात मेळावे, बैठका होत आहेत. त्यात अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होत आहेत. निवडणुकीबाबत वरिष्ठ पातळीवर महायुतीच्या समन्वयकांच्याही बैठका झाल्या असून त्यातून निवडणूक एकत्रच लढवावी, असा सूर उमटत आहे. परंतु प्रत्येक विधानसभा मतदारसंघात वेगवेगळी समीकरणे आहेत. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाचे म्हणणे ऐकूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. पण, महायुती अभेद्य असेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी केले.
सोमवार (दि. 21) जुुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात शहर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्यात तटकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी खा. आनंद परांजपे, माजी आ. राजन पाटील, यशवंत माने, संजय शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, जनरल सेके्रटरी प्रमोद भोसले, चंद्रकांत दायमा, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता जोगधनकर, कार्याध्यक्षा चित्रा कदम, सायरा शेख, आनंद मुस्तारे, किरण माशाळकर, वसीम बुर्हाण, दीपाली पांढरे आदी उपस्थित होते. प्रारंभी पक्षाचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी स्वागत तर शहराध्यक्ष संतोष पवार यांनी प्रास्ताविक केले.
खा. तटकरे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून राज्यव्यापी दौरा सुरू आहे. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने विजय मिळाल्याचा दावा केला होता. महायुतीचा विजय विरोधकांना खुपला नाही. त्यामुळे त्यांनी महायुतीविरूध्द अफवा पसरविल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे त्यांना ताकद देण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार आणि एकनाथ शिंदे हे निश्चितच करतील. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, याची ग्वाही हीॅ तटकरे यांनी यावेळी दिली.