

महूद : सांगोला तालुक्यातील महावितरण कंपनीच्या बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांना गेल्या तीन महिन्यापासून पगार न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
सांगोला तालुक्यातील महावितरण कंपनीकडे सांगोला आणि हातीद उपविभागा अंतर्गत बाह्यस्रोत कंत्राटी कामगार म्हणजेच प्रकाशदूतांची नेमणूक करण्यात आली आहे. सांगोला आणि हातीद या दोन उपविभागात मिळून बाह्यस्रोत लाईनस्टाफ 61 आणि बाह्यस्रोत ऑपरेटर 55 इतक्या कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. या कामगारांना गेल्या सुमारे तीन महिन्यापासून काम करूनही पगार मिळालेला नाही. दिवस रात्र ऊन वारा पाऊस याची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता हे प्रकाशदूत कामासाठी नेहमी सज्ज असतात. या कंत्राटी कर्मचार्यांना सुमारे तीन महिन्यापासून पगार न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
महावितरण कंपनीत इतर कायम कर्मचार्यांचा पगारी महिना संपायच्या आत म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या 28 तारखेला पगार केला जातो. या कायम कर्मचार्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे परंतु बाह्यस्रोत अर्थात कंत्राटी कर्मचार्यांना त्यांच्या श्रमाचा पगार वेळेवर का दिला जात नाही याचे कोडे पडले आहे. बाह्यस्रोत पद्धतीने कंत्राटी प्रकाशदूत भरण्यासाठी जी ए डिजिटल दिल्ली या कंपनीला ठेका देण्यात आला आहे. संबंधित कंत्राटी कामगार या ठेकेदार कंपनीच्या कर्मचार्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करतात. मात्र संबंधित ठेकेदार कंपनीचे कर्मचारी त्यांचा फोन घेत नाहीत. एखाद्या वेळेस फोन घेतलास तर पगाराबाबत विचारणा करणार्या कंत्राटी कामगाराला तुला कामावरून काढून टाकले जाईल अशी धमकी देतात. महावितरण कंपनीमध्ये दर्जेदार सेवा तसेच अखंडित वीजपुरवठा आणि शंभर टक्के वीज बिल वसुली करणे आदी कामे हे कंत्राटी कामगार प्रामाणिकपणे करताना दिसतात.
कंत्राटदारा मार्फत पुरविण्यात येणार्या बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय महावितरण च्या वतीने घेण्यात आला होता. त्यानुसार एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2024 या सहा महिन्यांच्या काळातील पगारातील फरक सांगोला तालुक्यातील कंत्राटी कामगारांना अद्यापही मिळालेला नाही. याबाबत कंत्राटदार कंपनी कोणतीही कार्यवाही करत नसल्याने कंत्राटी कर्मचार्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे.