

माळीनगर : लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी मतदाराच्या बोटावर लावली जाणारी 'अविट शाई' वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. माळशिरस तालुक्यातील सवतगव्हाण येथील मतदान केंद्रावर मतदान करून आल्यानंतर काही वेळातच एका मतदाराच्या बोटावरची शाई पुसली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे निवडणूक प्रशासनाकडून वापरल्या जाणाऱ्या शाईच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सवतगव्हाण येथील मतदान केंद्रावर एका मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला. नियमाप्रमाणे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली. मात्र, हा मतदार घरी गेल्यानंतर नाश्ता करून हात धुत असताना, त्याच्या बोटावरील शाई पूर्णपणे निघून गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. "मतदान करून घरी आल्यावर हात धुतले आणि शाई गायब झाली. जर शाईच टिकत नसेल, तर मतदानाच्या पारदर्शकतेचे काय?" असा संतप्त सवाल या मतदाराने आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
निवडणुकीत बोगस मतदान रोखण्यासाठी ही शाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते. एकदा लावलेली शाई किमान आठवडाभर तरी टिकणे अपेक्षित असते. मात्र, सवतगव्हाणमधील या प्रकारामुळे परिसरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वीही काही निवडणुकांमध्ये शाई पुसली गेल्याचे प्रकार गाजले होते, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तोच प्रकार पुनरावृत्त झाल्याचा आरोप मतदारांनी केला आहे.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली असून, इतर मतदारांनीही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. शाई निकृष्ट दर्जाची होती की लावण्याच्या पद्धतीत काही त्रुटी होती, याबाबत आता प्रशासनाकडून स्पष्टीकरण मिळणे गरजेचे झाले आहे. विरोधकांनी आणि सजग नागरिकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.