

सोलापूर : संगमेश जेऊरे
राज्यातील दूध उत्पादनाने १६६.२६ लाख मेट्रिक टनांचा टप्पा गाठला असला, तरी पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता हा गंभीर प्रश्न कायम आहे. परंतु दुसरीकडे संकरित गाय व म्हैसवर्गीय जनावरांना वाढत्या तापमानाचा फटका बसण्याची शक्यता वाढली असून, त्यात दूध उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
राज्यातील विभागनिहाय दूध उत्पादनात पुणे विभाग आघाडीवर आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, पुणे विभागात ७७.२५ लाख मेट्रिक टन दूध उत्पादन झाले असून, त्याचा राज्याच्या एकूण उत्पादनातील वाटा सुमारे ४६ टक्के आहे. नाशिक विभाग ४४.७१ लाख मेट्रिक टन उत्पादनासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात २४.८५ लाख मेट्रीक टन, लातूर विभागात १३.४५ लाख मेट्रीक टन, नागपूर विभागात ७.७१ लाख मेट्रीक टन, अमरावती विभागात ६.७४ लाख मेट्रीक टन आणि कोकण विभागात ५.४० लाख मेट्रीक टन दूध उत्पादन आहे.
भारतीय गवताळ प्रदेश आणि चारा संशोधन संस्थेच्या, झाशी येथील अभ्यासानुसार एकूण चाऱ्यापैकी सुमारे ६० टक्के चारा कृषी पिकांच्या अवशेषांतून मिळतो. वनक्षेत्रातून १०.३० टक्के, तर गायरान आणि चराऊ क्षेत्रांतून ९.३० टक्के चारा मिळतो. उर्वरित चारा बांधावरील गवत, पडीक जमीन आणि वैरण पिकांमधून उपलब्ध होतो. परंतु यंदा अपेक्षित पाऊसच न झाल्याने त्याचा फटका कृषी पिकांच्या अवशेषांतून होणाऱ्या चाऱ्यांवर झाला आहे.
संकरित गायींचा उत्पादनात मोठा वाटा
शासनाच्या वैरण विकास धोरणात प्रसिध्द करण्यात आलेल्या अहवालानुसार राज्याच्या दूध उत्पादनात संकरित गार्टीचा वाटा सुमारे ५४ टक्के आहे. म्हशींचा वाटा ३३ टक्के, तर देशी गाींचा वाटा १० टक्के असल्याचे नमूद आहे. यावरून राज्यातील दूध व्यवसायात संकरित गायींचा वाटा अधिक आहे. त्यामुळे या संकरित गाय व म्हशींना वाढते तापमान सोसत नसल्याने त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होत आहे.
हिव्या चाऱ्यामुळे दूध घटणार
पावसाअभावी आता जनावरांना पुरेसा आणि संतुलित आहार मिळण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर तसेच दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून, जनावरांना सुका चाराबरोबर हिरव्या चाऱ्याचीही आवश्यकता असते. केवळ दूध उत्पादन वाढविण्यावर भर न देता चारा उत्पादन, साठवणूक आणि टंचाईच्या काळातील पुरवठा यांचे नियोजन करणे आवश्यक आहे.