Medical Value Tourism : राज्यात लवकरच ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’; नव्या उद्योगाला चालना

परदेशी रुग्णांना माफक दरात दर्जेदार वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात लवकरच ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ ही योजना सुरू होणार
Medical Value Tourism
Medical Value Tourism
Published on: 
Updated on: 
आमसिद्ध व्हनकोरे

सोलापूर : परदेशी रुग्णांना माफक दरात दर्जेदार वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात लवकरच ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ ही योजना सुरू होणार आहे. तामिळनाडूच्या धर्तीवर ही योजना राबविण्याचा उद्देश असून, त्याबाबतचा शासन निर्णय लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे राज्यातील आरोग्यसेवेला चालना मिळणार असून बेरोजगार तरूणांना रोजगाराच्या व नव्या उद्योगाच्या संधी निर्माण होणार आहेत.

मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक यांसह राज्यातील अन्य शहरांमध्ये मोठी सरकारी व खासगी रुग्णालये आहेत. येथील वैद्यकीय सेवा-सुविधांचा उपयोग हा परदेशी रुग्णांना मिळणार आहे. यात उपचार, शस्त्रक्रिया व अन्य वैद्यकीय उपचाराची सेवा वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जगातील विविध देश व तेथील रुग्णालयांशी करारही करण्यात येणार आहे. तसेच उपचारासाठी राज्यात येणाऱ्या रुग्णांना या योजनेअंतर्गत व्हिसा प्रक्रियेसाठीही मदत केली जाऊ शकते.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि ईएसआयसीच्या धर्तीवर रुग्णालयांना सहभागी करून घेत ही योजना राबविण्याचे नियोजन आहे. राज्यातील सक्षम आरोग्य यंत्रणा व वैद्यकीय तज्ज्ञांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याची ओळख निर्माण करण्याचा मुख्य उद्देश आहे.

तीन प्रमुख मागण्या

लहान रुग्णालयांना मान्यता : पाच खाटांपर्यंतच्या खासगी रुग्णालयांना आणि डे केअर सेंटरना मान्यता देणे.

अवयवदानाला चालना : जिल्हा रुग्णालयांत अवयवदानासाठी रोटो-सोटो यंत्रणा विकसित करण्याचे नियोजन.

उपचार सुविधा व माहिती : राज्यस्तरीय डॅशबोर्ड आणि हिमोफिलिया रुग्णांसाठी ‘हेमलिब्रा’ औषध उपलब्ध करण्याची तयारी.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

वाजवी दरात उपचार : परदेशी रुग्णांना उपचार, शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय सुविधा.

आंतरराष्ट्रीय सहकार्य : विविध देश आणि परदेशी रुग्णालयांशी करार.

व्हिसा प्रक्रियेत मदत : उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आवश्यक सहकार्य.

नव्या उद्योगाला चालना : रुग्णालये आणि वैद्यकीय सेवांशी संबंधित व्यवसायांच्या संधी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news