

सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 10 जानेवारी रोजी सोलापुरात सभा होणार आहे. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. या सभेने भाजपा उमेदवारांना बळ मिळणार असून मुख्यमंत्री फडणवीस यावेळी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते जाहिरनामा प्रसिध्द करुन भाजपाने प्रचारात मुसंडी मारली आहे. आता थेट फडणवीस यांची सभा होणार असल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुख्य म्हणजे सोलापुरचे हार्ट समजल्या जाणाऱ्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर ही सभा होत आहे. फडणवीस हे गेल्या वेळेस सोलापुरात आले आणि त्यांनी आयटी पार्कची घोषणा केली. आयटी पार्कसाठी आता जागा फायनल होऊन ते उभारण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सोलापूरसाठी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याने भाजपा उमेदवारांना बळ मिळणार आहे. त्यासाठी पक्षाने जय्यत तयारी सुरु केली आहे.
गट तट संपवून पक्ष म्हणून एकत्र येणार
भाजपामध्ये गट तट संपवून पक्षाला एकसंघ करण्याची किमया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. गेल्यावेळी सोलापुर दौऱ्यावर आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. विजयकुमार देशमुख यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत मालक म्हणतील तसं असा संदेश दिला. त्याच कार्यक्रमात आ. सुभाष देशमुख यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळात केलेल्या कामाचे कौतुक केले. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनात आ. देवेंद्र कोठे यांच्या सभागृहातील भाषणावर त्यांची पाठ थोपटली. आता 10 तारखेच्या दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस हे तिघांबरोबरच पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना एकत्र आणून एकसंघ भाजपाचा नारा देण्याची शक्यता आहे.