

सोलापूर : महाराष्ट्र सीईटी सेलच्या माध्यमातून पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत (एल.एल.बी. पाच वर्षीय सीईटी) मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. या परीक्षेचा नुकताच जाहीर झालेला निकाल संशयास्पद आहे. यामुळे सीईटी सेलचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
राज्यात आणि राज्याच्या बाहेरील काही प्रमुख शहरांमधील परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळाले आहेत ते चारही विद्यार्थी पटना येथील ’माही इन्फोटेक’ या परीक्षा केंद्रावरील असल्याने या परीक्षेत गैरप्रकार झाल्याची शक्यता विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सुधारित निकाल जाहीर करावा, अशी विद्यार्थी संघटनांची मागणी आहे. अन्यथा, अभाविप रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.
एल.एल.बी (पाच वर्षीय) सीईटीसाठी 35 हजार 74 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 27 हजार 372 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. जवळपास 7 हजार 702 विद्यार्थी गैरहजर होते. म्हणजेच अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे 80 टक्के विद्यार्थ्यांनी ही प्रवेश परीक्षा दिली आहे.