

सोलापूर : गरीब व गरजू अत्यल्प उत्पन्न गटातील रुग्णांसाठी किचकट व पाच लाखांपेक्षा जास्त उपचाराचा खर्च येणार्या नऊ विविध प्रकारच्या दुर्धर आजारांवरील राज्य शासनाच्या राखीव निधीतून केला जाईल. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्यात आली. शिवाय, विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांच्या उपचाराच्या दाव्यापोटी मिळणारी रक्कम ही राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीसाठी व तसेच शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेत आरोग्य संरक्षणाची मर्यादा प्रति कुटुंब प्रति माणूस पाच लाख रुपयेपर्यंत वाढवण्यात आले आहे. यापूर्वी एखाद्या अवयवाच्या प्रत्यारोपणासारख्या पाच लाखापेक्षा अधिक खर्च येणार्या दुर्मीळ आजाराच्या उपचारांसाठी शासनाकडून पैसे मिळत नसे. यापुढील काळात हृदय प्रत्यारोपणासाठी 15 लाख, फुफ्फुस प्रत्यारोपण 20 लाख, हृदय व फुफ्फुस या दोन्हींच्या प्रत्यारोपणासाठी 20 लाख, अस्थिमज्जा प्रत्यारोपण (अनरिलेटेड) 17 लाख, अस्थिमज्जा प्रत्यारोपण (हॅप्लो) 17 लाख, हृदयाशी संबंधित उपचारासाठी केल्या जाणार्या ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन 10 लाख, तर ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट 10 लाख रुपये, यकृत प्रत्यारोपण 22 लाख, अस्थिमज्जा प्रत्यारोपण (अलोजेनिक) 9.5 लाख असा उपचाराचा खर्च गरीब व अत्यल्प उत्पन्न गटातील रुग्णांवर करता येईल.