

श्रीपूर : सकाळी जोरदार पाऊस सुरू असतानाच पत्राशेडमध्ये बांधलेली जर्सी गाय मृत अवस्थेत दिसून आली. ते पाहण्यासाठी रसिका रेडे या गेल्या. मात्र, त्या शेडमध्ये वीज उतरल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला. हे शेजारी असलेल्या प्रियंका रेडे यांनी पाहिले.
रसिकांना काय झाले हे पाहण्यासाठी प्रियंका शेडजवळ गेल्या असता, त्यांचाही शेडला स्पर्श झाल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला. अशा रितीने विजेच्या धक्क्याने दोन महिलांसह एका जर्सी गायीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना महाळुंग (ता. माळशिरस) ढवळे वस्ती येथे घडली. दरम्यान, ही घटना समजताच अमोल रेडे यांनी त्वरित डिपीतील फ्युज काढून विद्युत पुरवठा खंडीत केला. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रसिका विठ्ठल रेडे (वय 55) व प्रियंका अमोल रेडे (वय 28) या दोघी चुलत सासू-सून होत. रसिका विठ्ठल रेडे या मुलगा सचिन रेडे, सून व नातवंडांसह ढवळे वस्ती येथे राहत होत्या. त्यांच्या चार जर्सी गाई शेडमध्ये बांधलेल्या होत्या. त्यांच्या शेजारीच चुलत सून प्रियंका अमोल रेडे या वास्तव्यास होत्या. त्या पेशाने शिक्षिका होत.
बुधवारी सकाळी पाऊस सुरू होता. यावेळी शेडमध्ये बांधलेल्या चार गाईंपैकी एक गाय मृत दिसली. यामुळे रसिका रेडे तिला पाहण्यासाठी शेडमध्ये गेल्या. त्यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये वीज उतरली होती. त्या विजेच्या धक्क्याने त्यांना जागीच मृत्यू झाला. त्याठिकाणी असलेल्या प्रियंका रेडे ही घटना पाहत असताना त्यांचा जाळीला हात लागला. तेव्हा त्यांनाही विजेचा धक्का बसला. त्यामुळे त्या देखील जागीच मृत्युमुखी पडल्या. या घटनेची माहिती कळताच अमोल रेडे यांनी त्वरित धावत जाऊन महावितरणच्या डीपीतील फ्युज काढून वीजपुरवठा खंडित केला. प्रियंका रेडे या जिल्हा परिषद शाळेत नुकत्याच शिक्षिका म्हणून कामाला लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली.