

बार्शी : राष्ट्रीय महालोकअदालतीत विविध स्वरूपाची ९१० प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांत एकूण २ कोटी ६२ लाख ९६ हजार ६९१ रुपयांची वसुली झाल्याची माहिती बार्शी तालुका विधी सेवा समितीच्या वतीने देण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका विधी सेवा समिती आणि बार्शी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१ सूरज व्ही. केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली लोकअदालतीचे कामकाज झाले.
या राष्ट्रीय महालोकअदालतीसाठी बार्शी न्यायालयातील प्रलंबित दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी स्वरूपाची ३४०९ प्रकरणे, तसेच दाखलपूर्व ४३५५ प्रकरणे, अशी एकूण ७७६४ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यापैकी प्रलंबित प्रकरणांमध्ये २ कोटी ७२ हजार ४१ रुपये, तर दाखलपूर्व प्रकरणांमध्ये ६२ लाख २४ हजार ६५० रुपये, अशी रक्कम वसूल झाली.
लोकअदालतीसाठी बार्शी न्यायालयात एकूण सहा पॅनल स्थापन करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हा न्यायाधीश-१ सूरज व्ही. केंद्रे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ आर. एस. रोटे, अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश पी. डी. सुभेदार, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही. व्ही. चव्हाण, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. व्ही. राऊत आणि तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आर. पी. बागडे यांचा समावेश होता.
याशिवाय सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस. एस. सुके यांच्या न्यायालयात गुन्हा कबुलीचे विशेष न्यायालय सुरू ठेवण्यात आले होते. वयोवृद्ध पक्षकार लक्ष्मी तुकाराम अवचार यांची आपुलकीने विचारपूस करून न्यायालयाबाहेर जाऊन संबंधित न्यायाधीशांनी व्हेरिफिकेशन घेतले आणि त्यांचे प्रकरण तडजोडीने निकाली काढण्यात आले.