

कासेगाव : खरीप हंगाम २०२६ साठी राज्य शासनाच्या महा डीबीटी पोर्टलवर बी-बियाणे अनुदान योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. कारळे, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबीन आदी पिकांच्या बियाण्यांसाठी पात्र शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. अर्ज MahaDBT Portal (mahadbt.maharashtra.gov.in) वर सुरू असून, अंतिम तारीख शासनाकडून लवकरच जाहीर होणार आहे.
शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरूनही महा डीबीटी अॅप/वेबसाईटद्वारे नोंदणी करून अर्ज सादर करू शकतात. तसेच जवळच्या महा-ई सेवा किंवा सीएससी केंद्रामार्फतही अर्ज भरता येतो. नोंदणी करताना आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक व शेतकरी नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य आहे.
अर्जासाठी ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधार कार्ड, बँक खाते तपशील (अनुदान थेट खात्यात जमा होण्यासाठी), मोबाईल क्रमांक तसेच अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. ऑनलाइन अर्जासाठी शासनाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही; मात्र ई-सेवा केंद्रावर नाममात्र सेवा शुल्क लागू होऊ शकते.
निवड प्रक्रिया शासनाच्या निकषांनुसार व उपलब्ध निधीनुसार केली जाते. “प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर अनुदान वाटप केले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची निवड, क्षेत्रफळ व वैयक्तिक माहिती अचूक भरावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. अर्ज सादर केल्यानंतर पावती जतन करून अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासावी. शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी विभाग यांनी केले आहे.