

माढा : माढा तालुक्यात शक्तिपीठ महामार्गासाठी बाधित होणाऱ्या गटांची मोजणी धानोरे (ता. माढा) येथून सुरू झाली असून, मोजणीसाठी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले हे उपस्थित होते. यावेळी माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील या महामार्गात बाधित होणारे शेतकरी धानोरे या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी मोजणीस हरकत घेत मोजणी रोखण्याचा प्रयत्न केला.
शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर या भागातील ज्या गटातून हा महामार्ग जाणार आहे. त्याचे गट नंबर जाहीर करण्यात आले. बार्शी तालुक्यातील मोजणी पूर्ण झाल्यानंतर माढा तालुक्यातील धानोरे येथे शुक्रवारी सकाळपासून मोजणीस पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. यावेळी शेतकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया असताना माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगाव येथील व पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील शेतकरी या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी या मोजणीस हरकत घेतली. यावेळी शेतकरी व मोजणी कर्मचारी यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर मोजणीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीपीएस मशिनचे नुकसान करण्यात आले.
या प्रकरणानंतर बार्शीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तथा परीविक्षाधीन आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या माढा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. त्यापूर्वी माढ्याचे सपोनि रोहित शिंदे यांनी मोजणीस हरकत घेतलेल्या माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ताब्यात घेतले होते. साधारणता 50 हून अधिक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत कोणताही प्रकारचा गुन्हा नोंदला नव्हता.