

माढा : महापुरुषांचा पुतळा किंवा स्मारक उभे करताना रितसर परवानगी घेऊन उभे करावे. अन्यथा पोलीस व प्रशासन त्यावर कायदेशीर कडक कारवाई करेल, असा इशारा माढा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक महेश ढवाण व माढा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी रोहित शिंदे यांनी दिला.
माढा पोलिस ठाण्यात माढा शहर व परिसरातील लोकप्रतिनिधी विविध समाजाच्या कार्यकर्त्यांच्या एका बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्वांना पोलिस निरीक्षक ढवाण यांनी महापुरुषांचे पुतळे उभरताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ते उभे करावेत. महापुरुषांना जातीच्या बंधनात आपण कोणीही अडकवू नये. महापुरुषांचे विचार अंगीकारले पाहिजेत. या पुतळ्यामुळे सामाजिक समता धोक्यात येईल असे वर्तन कोणीही करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सपोनि रोहित शिंदे यांनी सामाजिक सलोखा बिघडेल किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असे वर्तन कोणीही करू नये अशा सक्त सूचना दिल्या. सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीसाठी जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, माढ्याचे माजी सरपंच दादासाहेब साठे, पीएसआय महम्मद शेख, संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे, रवी सरवदे, बी. बी. एस. ग्रुपचे अध्यक्ष सुधीर लंकेश्वर यांच्यासह इतर उपस्थित होते.