

माढा : माढा शहरातून आषाढी वारीसाठी मार्गक्रमण करणार्या व मुक्कामी असणार्या दिंडी व पालख्यामधील वारकर्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याची तक्रार दिंडीप्रमुख यांच्यासह वर्धा जिल्ह्यातील आर्वीचे भाजपचे आ. सुमीत वानखेडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी कडक शब्दांत समज दिल्यानंतर वारकर्यांना नगरपंचायत प्रशासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
30 जून रोजी कौडण्यपूर येथील दिंडी माढा मुक्कामी असताना त्या दिंडीतील प्रमुखांची व वारकर्र्यांची झोपण्याची व्यवस्था केली गेली नसल्याने प्रमुखांनी जिल्हाधिकार्यांना कळवले. जिल्हाधिकार्यांनी तातडीने याची दखल घेत माढा तहसीलदारांना सक्त सूचना केल्या. माढा तहसीलदार हे टेंभूर्णी येथे इतर पालख्यांच्या व्यवस्थापनात असताना तातडीने माढ्यात दाखल झाले. नगरपंचायत प्रशासनातील संबंधिताना बोलावून घेत संबंधित तक्रार करणार्यांची सोय केली. महसूल प्रशासनातील मंडलाधिकार्यांना तहसीलदारांनी स्वतः जातीने लक्ष द्यायला सांगितले.
याच दरम्यान आर्वी (जि. वर्धा) येथील आ. सुमीत वानखेडे हे माढा येथे आले होते.त्यांनी वारकर्यांशी प्रशासनाकडून पुरविल्या जाणार्या सुविधा, रस्ते व्यवस्थित आहेत का, पिण्याचे पाणी उपलब्ध आहे का, स्वच्छतेबाबत वारकरी समाधानी आहेत का याबाबत चर्चा केली मात्र वारकर्यांनी याबाबत नाराजी दर्शवली. आ. वानखेडे यांनी ही बाब जिल्हाधिकार्यांच्या कानावर घालून नाराजी व्यक्त केली होती.
या प्रकारानंतर 1 जूलै रोजी मानाची असलेली श्री संत मुक्ताई पालखीच्या नियोजनात कोणतीही कसर राहू नये, यासाठी तहसीलदारांनी नगरपंचायत प्रशासनाला लेखी पत्राव्दारे सूचना केल्या होत्या तरीदेखील पालखी मार्गावरुन मार्गक्रमण होत असताना मुक्ताईंच्या रथास झाडांच्या फांद्या आडव्या येतच होत्या. या प्रकारांबाबत वारकर्यार्ंंमधून नाराजी व्यक्त झाली. यातून नगरपंचायत प्रशासनाचा बेफिकीरपणा दिसून आला. वारी संपल्यानंतर जिल्हाधिकारी आता काय कारवाई करतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
माढा शहरात अमरावती जिल्ह्यातून येणारी कौडण्यपूर येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थानची दिंडी माढा मार्गे पंढरपूरला जाते. माढा मुक्कामी असणार्या या दिंंडी सोहळ्याला शहरात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माढा नगरपंचायत प्रशासनावर होती. तसे त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आधीच सूचित केले होते. या दिंडीशिवाय श्री संत मुक्ताई यांच्या पालखी सोहळ्याची जबाबदारीही नगरपंचायतीवर असते. हे दोन्ही पालखी सोहळे माढा मुक्कामी असतात.