

- मदन चवरे
माढा तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सात जिल्हा परिषद गटामध्ये सहा जागा जिंकत माजी आमदार बबनराव शिंदे व संजयमामा शिंदे यांनी भाजपसोबत केलेल्या आघाडीने विरोधी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार अभिजीत पाटील यांच्या आघाडीस मोठा धक्का दिला. पंचायत समितीच्या 14 जागांपैकी शिंदे विरोधी मोहिते पाटील आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीस केवळ दोन जागा जिंकता आल्या. या निवडणुकीत भाजपने आपले ग्रामीण भागात चांगलेच बस्तान बसवले.
माढा तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटापैकी माढा विधानसभा मतदारसंघात पाच जिल्हा परिषद गट येतात. या पाच गटापैकी चार गटात भाजपचे उमेदवार विजयी झाले. मानेगाव गटात पृथ्वीराज सावंत यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील जामगावकर यांचा 7 हजाराहून हून अधिक मताधिक्याने पराभव केला.
मोडनिंब जिल्हा परिषद गटात सभापती राहिलेले शिवाजी राजे कांबळे व भारत शिंदे यांच्यात काँटे की टक्कर होती. या दोघांच्या सौभाग्यवती आमने-सामने होत्या. यापैकी वंदना शिवाजी कांबळे यांनी शिंदे यांचा पाच हजारांना अधिक मतांनी पराभव केला. उपळाई जिल्हा परिषद गटात भाजपच्या माधुरी मोरे 3000 मतांनी विजयी झाल्या. टेंभुर्णी येथे चुरशीच्या झालेल्या लढतीत भाजपच्या नवख्या उमेदवार ॲड. अमृता वाघे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य अंजना देवी शिवाजीराव पाटील यांचा पराभव केला. बेंबळे जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या ठिकाणी लक्षवेधी लढतील. संजय कोकाटे यांच्या पत्नी सविता यांनी जि.प. सदस्य रोहिणी ढवळे यांचा पराभव करत भाजपला पर्यायाने शिंदे बंधू यांना मोठा धक्का दिला.
माढा तालुक्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या भोसरे व कुर्डू या जिल्हा परिषद गटावर अपेक्षेप्रमाणे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहायला मिळाले. कुर्डू येथे संभाजी ढाणे तर भोसरे येथे अश्विनी दळवे यांनी दणदणीत विजय संपादन केला.
14 पंचायत समिती गणात दारफळ, मोडनिंब, बेंबळे या पंचायत समिती गणात माजी आमदार शिंदे यांचे विरोधक विजयी झाले. दारफळ पंचायत समिती गणात अपक्ष उमेदवार सोनाली मुन्ना साठे यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली. या ठिकाणी भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का सहन करावा लागला. राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे बेंबळे गणातील पोपट अनपट हे एकमेव उमेदवार विजयी झाले. 14 जागांपैकी सहा जागा भाजपच्या, एक जागा भाजप पुरस्कृत, पाच जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या, शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीची एक जागा तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. मानेगाव गणातील भाजपचे पंडित काका देशमुख हे 4000 च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. पंचायत समिती गणातील त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. पंचायत समितीच्या 14 जागांपैकी अकरा जागा या माजी आमदार शिंदे यांच्या भाजप व राष्ट्रवादीच्या आघाडीने जिंकल्या असल्याने पंचायत समितीवर पुन्हा एकदा माजी आमदार शिंदे यांचे वर्चस्व सिद्ध झाले.